बाभळे औद्योगिक वसाहतीत प्लॅस्टीक कंपनीत आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:50 IST2020-02-28T13:49:37+5:302020-02-28T13:50:05+5:30
तीन दिवसात दुसरी घटना : नागरिकांनी मिळविले आगीवर नियंत्रण

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
दत्तवायपूर/नरडाणा : शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतील फेज दोन बाभळे हद्दीतील कंपन्यांमधे आगीचे सत्र सुरूच आहे. बुधवार २६ रोजी प्लास्टीकच्या पाण्याच्या टाक्या बनविणाऱ्या शिव प्लास्ट कंपनीमध्ये दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली. ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थांना कळताच अग्निशामक विभागाला व गावातील कार्यकर्त्यांना कळवून आग विझविण्यास मदत केली.
बाभळे फेज दोन येथे तीन दिवसापूर्वी डॉ.एजाज शेख यांच्या मालकीची सेवा सर्जिकल कंपनीला आग लागली होती. तसेच बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिव प्लास्ट कंपनीला (हिमालया टाकी) अचानक लागल्याची महिती बाभळे येथील सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांना मिळाल्याने ग्रामस्थांना सहकार्यासाठी बोलवून घटनास्थळी धाव घेतली. कंपनीत असलेल्या फायर सुरू करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तो पावेतो धुळे येथील दोन अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले होते.
आगीत वेस्टेज माल जळून खाक झाला. वेळीच आग विझविल्याने मोठे नुकसान टळले. कंपनीच्या बाजूला कचरा जाळून कर्मचारी जेवणासाठी निघून गेले. त्यामुळे आग वाढली आणि वेस्टेज पडलेल्या प्लॅस्टिकने पेट घेतला. तसेच स्टोअर रुममध्ये असलेल्या पंधरा गॅस सिलिंडर बाजूला केल्याने अनर्थ टळला. मात्र आगीत सात ते आठ लाखाचे नुकसान झाल्याचे कंपनीचे संचालक राजेश वाणी यांनी सांगितले.
आग लागल्यानंतर निघणारा धूर बाभळे फाट्यावर दिसत असल्याने शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुशील गांगुर्डे हे रस्त्याने जात असतांना त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सर्व ग्रामस्थांनी जिव धोक्यात टाकून आग आटोक्यात आणली. यात कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी फायर सुरू करून आग आटोक्यात आणली.
आग लागल्यानंतर सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच भरत पाटील, हिरालाल पाटील, गोविंदा ठेलारी, मनोहर रूपनर, सुकदेव ठेलारी, विकास पाटील, समाधान पाटील, रोशन आदींनी आग विझविण्यास मदत केली. आगीची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत चिमठाणे दुरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे, प्रभाकर सोनवणे, दिपक माळी, राजू पावरा यांनी घटनास्थळी धाव घेतली व झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. यासंदर्भात पुढील तपास पोलीस करीत आहेत.