मधमाशी पालन व्यवसाय प्रशिक्षण केंद्रासाठी योजना;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:18+5:302021-08-27T04:39:18+5:30
धुळे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) कार्यान्वित केली आहे. या योजनेचा पात्र ...

मधमाशी पालन व्यवसाय प्रशिक्षण केंद्रासाठी योजना;
धुळे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) कार्यान्वित केली आहे. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी पी. ए. विसपुते यांनी केले आहे.
या योजनेसाठी पात्र व्यक्ती, संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता अशी : वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षणासाठी पात्रता पुढीलप्रमाणे : अर्जदार साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.
केंद्र चालक प्रगतशील मधपाळ, संस्था व्यक्ती प्रशिक्षणासाठी पात्रता : किमान दहावी उत्तीर्ण असावा, वय २५ वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी, लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्र चालक संस्था प्रशिक्षणासाठी पात्रता : संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे मालकीची किंवा दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेली किमान एक एकर शेतजमीन असावी. प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी, संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाच्या बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.
योजनेची वैशिष्ट्ये : मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ७० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती.
अटी व शर्ती : लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासाठी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व होतकरू शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जमनागिरी रोड, धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.