शेतकऱ्यांना रासायनिक खते वेळेत मिळतील, असे नियोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:36 IST2021-04-27T04:36:33+5:302021-04-27T04:36:33+5:30
धुळे : धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होईल. या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील, असे ...

शेतकऱ्यांना रासायनिक खते वेळेत मिळतील, असे नियोजन करावे
धुळे : धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होईल. या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील, असे नियोजन कृषी विभागाने करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात खरीप हंगाम - २०२१करिता बियाणे व युरिया (बफर स्टॉक) उपलब्धतेबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी जगदाळे बोलत होते. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी विनय सोनवणे यांच्यासह बियाणे, खते निर्मिती करणाऱ्या कंपनींचे प्रतिनिधी, जिनिंग - प्रेसिंग मिलचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी जगदाळे यांच्या हस्ते भित्तीपत्रिका व घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
जगदाळे म्हणाले, धुळे जिल्ह्यात कपाशीची लवकर लागवड केली जाते. त्यामुळे शेतकरी लवकर मशागतीला सुरुवात करतात. कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत बी-बियाणे, रासायनिक खते उपलब्ध होतील, याचे नियोजन करावे. तसेच कापूस हे या भागातील प्रमुख नगदी पीक आहे. मात्र, कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे उत्पादनात घट होते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक पीक व्यवस्थापन या विषयावर जनजागृती करावी. कपाशीची लागवड या विषयावर शेतकऱ्यांमध्ये कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून जनजागृती करावी.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी सांगितले, आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केले आहे. बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करून देण्याची सूचना कंपन्यांना केली आहे. गुलाबी बोंडअळी निर्मूलनासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.