जिल्ह्यात रोहयोंतर्गत २१ हजार ६४३ कामांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:03+5:302021-05-12T04:37:03+5:30
धुळे : ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात २१ हजार ६४३ कामांचे नियोजन प्रशासनाने ...

जिल्ह्यात रोहयोंतर्गत २१ हजार ६४३ कामांचे नियोजन
धुळे : ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात २१ हजार ६४३ कामांचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सेल्फवरील या कामांची मजूर क्षमता तब्बल ९९ लाख ४३ हजार इतकी आहे; परंतु सद्यस्थितीत प्रत्यक्षात ५८४ कामे सुरू असून, २ हजार ५२४ मजुरांची उपस्थिती आहे. त्यात सर्वाधिक ४८६ घरकुलांची कामे आहेत.
कोरोना संसर्ग आणि कठोर निर्बंधामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत जास्त कामे सुरू करून ग्रामीण भागात मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या रोहयो विभागाने ग्रामपंचायत स्तरावर २० हजार ९३४ आणि इतर ७०९ अशा एकूण २१ हजार ६४३ कामांचे नियोजन केले आहे. या कामांवर तब्बल ९९ लाख ४३ हजार मजुरांना रोजगार मिळू शकतो; परंतु ही कामे प्रत्यक्षात सुरू नसून सेल्फलवर आहेत. मजुरांच्या उपलब्धतेनुसार तसेच कामांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने ही कामे सुरू केली जातील, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या ५८४ कामे सुरू असून, २ हजार ५२४ मजुरांना काम मिळाले आहे. त्यात ग्रामपंचायत स्तरावर जलसंधारणाच्या ५९ कामांचा समावेश आहे. कृषी विभागाची १४ तर इतर ५ कामे सुरू आहेत. जलसंधारणाची धुळे तालुक्यात २१, साक्री १६, शिंदखेडा १५ आणि शिरपूर तालुक्यात ७ कामे सुरू आहेत. या कामांवर ६०४ मजुरांची उपस्थिती आहे.
सर्वाधिक ४८६ कामे घरकुलाची सुरू आहेत. या कामांवर १ हजार ४७९ मजुरांना काम मिळाले आहे; परंतु पैसे थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने घरकुलाच्या कामांवर प्रामुख्याने कुटुंबातील सदस्यांचे जाॅब कार्ड असते. ज्यांना कामाची गरज नाही, अशा व्यक्तींची नावेदेखील मस्टरवर असतात. कुटुंबातील काही सदस्य अकुशल कामे करतात. घरकुलाची कामे ठेकेदारामार्फतच होत असल्याचे चित्र आहे. ठेकेदार मिस्तरी आणि गवड्यांकडून घरांची कामे करून घेतो. कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर ठेकेदाराचे पैसे अदा केले जातात. त्यामुळे घरकुलाच्या कामांवर गरजू मजुरांना रोजगार उपलब्ध होतो असे नाही.
यंत्रणांची उदासिनता कायम
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरजू मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी ग्रामपंचायत तसेच यंत्रणा स्तरावर कामे सुरू करणे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावर माेजकीच कामे सुरू आहेत. यंत्रणा स्तरावर शिरपूर तालुक्यात वनीकरणाची २ कामे सुरू असून, त्यावर १४७ मजूर आहेत. सामाजिक वनीकरणाचे शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात प्रत्येकी एक काम सुरू असून, अनुक्रमे ११ आणि १४ मजुरांना काम मिळाले आहे. कृषी विभागामार्फत शिंदखेडा तालुक्यात ३ कामांवर ८ मजुरांची उपस्थिती आहे.
ग्रामपंचायत स्तरावर साक्री तालुक्यात ४ आणि शिरपूर तालुक्यात १ काम रस्त्याचे सुरू आहे. अनुक्रमे ३८ आणि ४८ मजूर कामावर आहेत. कृषी विभागाची साक्री तालुक्यात १३, शिंदखेडा १ काम सुरू आहे. इतर ५ कामांवर २८ मजुरांची उपस्थिती आहे.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २१ हजार ६४३ कामांचे नियोजन केले आहे. टप्प्याटप्प्याने ही कामे सुरू केली जातील. जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. - गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी रोहयो.