लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. या खड्ड्यांमुळे काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे, तर काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचे सोयरसूतक ना मनपा प्रशासनाला आहे, ना सार्वजनिक बांधकाम विभागाला. वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ खड्यांचा विषय महापालिकेच्या बैठकांमध्ये देखील गाजला आहे़धुळे शहरातील खड्यांचा विषय दरवेळेस पावसाळा आल्यानंतर गाजतो़ त्यावर महापालिकेच्या बैठकांमध्ये काथ्याकूट देखील होत असतो, पण त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही़ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात असताना मात्र नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हाच मुद्दा सदस्यांनी चर्चेतून चव्हाट्यावर आणला होता़ लाखो रुपये खर्च करुनही त्याचा किती उपयोग झाला, कोणकोणत्या भागाचे खड्डे बुजविण्यात आले याचा तपशीलच सदस्यांनी मागितल्यामुळे पुन्हा हाच खड्यांचा विषय चर्चेत आला आहे़शहरातील खड्यांचा विषय दरवेळेस चर्चेत येत असल्यामुळे कायमस्वरुपी हा विषय संपुष्टात आणण्याची आवश्यकता आहे़ पण, हा विषय प्रशासनाकडून गांभिर्याने घेतला जात नसल्याचे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे़ खड्डे बुजविण्यात होणारा लाखों रुपयांच्या निधीचा विनियोग योग्यरितीने होणे अपेक्षित आहे़ ही बाब प्रशासनाने गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे़
लोकांच्याच जीवावर उठले खड्डे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:08 IST