पिंपळनेर शिवारातून पावणेदोन लाखांचा कांदा लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 22:26 IST2020-11-13T22:26:07+5:302020-11-13T22:26:42+5:30
२५ क्विंटल कांदा, एकाविरुध्द चोरीचा गुन्हा

पिंपळनेर शिवारातून पावणेदोन लाखांचा कांदा लांबविला
धुळे : पिंपळनेर शिवारातील बल्हाणे रस्त्यालगतच्या शिवारातून १ लाख ७० हजार रुपये किमतीचा २५ क्विंटल कांदा लंपास झाल्याची घटना १९ आॅक्टोबर रोजी दुपारी २ ते ४ दरम्यान घडली. याप्रकरणी १२ नोव्हेंबर रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील एखंडे गल्लीत राहणारे विलास गोविंद एखंडे (५४) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पिंपळनेर शिवारातील बल्हाणे रस्त्यावर शेत आहे. या शेतात त्यांनी एका बाजूला कांद्यासाठी चाळ उभारली होती. या चाळीत २५ क्विंटल कांदा ठेवलेला होता. त्याची बाजारभावाप्रमाणे १ लाख ७० हजार रुपये प्रमाणे किंमत आहे. १९ आॅक्टोबर रोजी दुपारी शेत शिवारात शांतता होती. कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने कांदा परस्पर काढून लांबविला. हा प्रकार दुपारी २ ते ४ वाजेच्या सुमारास घडला. कांदा चोरून नेल्याचे सायंकाळी कळाल्यानंतर परिसरात आजूबाजूला शोध घेण्यात आला. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. २५ क्विंटल कांदा हा संजय चैत्राम गावीत (गुजाळ, ता. साक्री) याने लंपास केल्याचा संशय आहे. त्यामुळे संजय गावीत याच्या विरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे पिंपळनेर पोलीस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस नाईक एस.जी. साळुंखे करीत आहेत.