पिंपळनेरला रेशन दुकानाचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST2021-05-05T04:58:41+5:302021-05-05T04:58:41+5:30
अपर तहसीलदार व त्यांचे पथक अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जात असतांना पिंपळनेर येथील प्रगती महिला बचत गटाच्या ...

पिंपळनेरला रेशन दुकानाचा परवाना रद्द
अपर तहसीलदार व त्यांचे पथक अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जात असतांना पिंपळनेर येथील प्रगती महिला बचत गटाच्या रेशन दुकानासमोर पिकअप वाहनामध्ये दुकानदार व वाहन चालक हे रेशनच्या धान्याची काळ्याबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहनात धान्य भरत होते. तहसीदारांनी सदर प्रकरणाची चोकशी करून दुकानचालक मयूर शंकर आढे-कासार आणि वाहनचालक वसीम शकील पटेल यांच्याविरुध्द भादंवि कलम ३७९ व १८६ सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सखोल चौकशी करण्यासाठी पुढील आदेश होईपावेतो परवाना निलंबत करण्यात आला होता.
तहसीलदारांनी दुकान क्रमांक १३ व त्यास जोडलेल्या दुकान क्रमांक १६ च्या केलेल्या सखोल तपासणीत मोठ्या प्रमाणावर तफावत साठा आढळून आलेला आहे. स्वस्त धान्य दुकानामध्ये कमी जास्त धान्यसाठा आढळून आल्याने सदरचे धान्य हे काळ्याबाजारात विकले आहे, किंवा काळ्याबाजारात विकण्याच्या दृष्टीने साठवून ठेवले आहे, असे स्पष्ट होते. चौकशीत रास्त भाव दुकानाचे परवानाधारक महिला बचत गटाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी दोषी आढळून आल्यावरून स्वस्त धान्य दुकान क्रमांक १३ ची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करून परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. तसेच परवानाधारक महिला बचत गटांचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्याविरुध्द ही जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले आहेत.