गव्हाणे फाट्यावर पिकअप वाहनाचा अपघात, मजुरासह मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 22:09 IST2020-08-04T22:09:05+5:302020-08-04T22:09:28+5:30
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग : २६ मजुर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

गव्हाणे फाट्यावर पिकअप वाहनाचा अपघात, मजुरासह मुलगा ठार
धुळे : धुळ्याच्या दिशेने मजूर घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनाचा अचानक टायर फुटला़ यामुळे पिकअप वाहन उलटल्याने अपघात झाला़ यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला़ त्यात एक ३० वर्षीय अनोळखी तरुण आणि १२ वर्षाचा पवन जगन सोलंकी (रा़ नांद्या, सेंधवा, मध्यप्रदेश) या मुलाचा समावेश आहे़ तर, पिकअप वाहनात असलेले २६ मजूर जखमी झाले आहेत़
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे फाट्यावर सकाळी ९ वाजेच्या सुमारास अपघात झाला़ मध्यप्रदेशच्या सेंधवा येथून एमपी ४६ जी २३२८ क्रमांकाच्या पिकअप व्हॅनमध्ये २५ ते ३० शेत मजूर धुळ्याच्या दिशेने निघाले़ ते शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी गावाच्या शिवारात एका शेतामध्ये कामासाठी जात होते़ अचानक व्हॅनचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले़ काही समजण्याच्या आत व्हॅन रस्त्याच्या बाजुला फेकली गेली़ या अपघातामुळे व्हॅनमधील जवळपास सर्वच मजुरांना दुखापत झाली आहे़ तर पवन जगन सोलंकी (१२, रा़ नांद्या, सेंधवा, मध्यप्रदेश) या मुलाचा तर एका ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला आहे़ अपघातानंतर महामार्गावरुन वावरणाºया अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली़ प्रचंड आक्रोश यावेळी झाला़ जखमी आणि मृतांना पिकअप व्हॅनच्या बाहेर काढण्यात आले़ या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़
अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांसह नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु व पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली़ जखमींना तातडीने नरडाणा, सोनगीर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ त्याचप्रमाणे अपघाताच्या ठिकाणी शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, शिरपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल माने यांनीही घटनास्थळी भेट दिली़
अपघाताच्या ठिकाणी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती़ कोरोनाच्या भीतीने जखमींना उचलण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नव्हते़ पोलिसांनी प्रयत्न करुन जखमींना रुग्णालयात हलविले़ अपघाताच्या ठिकाणी मजुरांचे जेवणाचे डबे, चपला, त्यांच्यासोबतच्या वस्तू विखुरलेल्या दिसून आल्या़ ही व्हॅन रोज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सेंधव्याहून महाराष्ट्रात येते़ शेतीची दैनंदिन कामे आटोपल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मजुरांना घेऊन ही व्हॅन परतीच्या प्रवासाला निघते़