साक्रीत विद्यानगरच्या प्रवेशद्वाराजवळ होऊ घातलेले परमिट रूम हटविण्यात यावे, विद्यानगरातील संतप्त महिलांचे लोकप्रतिनिधींना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:29+5:302021-09-15T04:41:29+5:30
विद्यानगर ही संपूर्ण शिक्षकांची कॉलनी आहे. याच कॉलनीत नामांकित खाजगी क्लास आहेत, मुलींचे शासकीय वसतिगृह, शाळा, हॉस्पिटल आहेत. या ...

साक्रीत विद्यानगरच्या प्रवेशद्वाराजवळ होऊ घातलेले परमिट रूम हटविण्यात यावे, विद्यानगरातील संतप्त महिलांचे लोकप्रतिनिधींना निवेदन
विद्यानगर ही संपूर्ण शिक्षकांची कॉलनी आहे. याच कॉलनीत नामांकित खाजगी क्लास आहेत, मुलींचे शासकीय वसतिगृह, शाळा, हॉस्पिटल आहेत. या क्लासेसला दहा ते अठरा वयोगटातील शेकडो मुले-मुली विद्यानगर प्रवेशद्वाराजवळील रस्त्याने दिवसभर ये-जा करतात. हे परमिटरूम जर सुरु झालेच तर अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनींच्या बालमनावर मोठा परिणाम होईल, असे महिलांचे म्हणणे आहे. प्रस्तावित परमिटरूम येथे सुरु होऊ नये यासाठी विद्यानगर,शिवाजीनगर, टाटीयानगर, गोपाळनगरसह साईबाबा मंदिर परिसरातील महिलांनी साक्री नगरपंचायतचे मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, जिल्हाधिकारी अशा सर्व संबंधितांना निवेदनाद्वारे कळविले आहे. मात्र संस्कार आणि सामाजिक जाणिवांविषयी भाष्य करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून व लोकप्रतिनिधींकडून परमिट रूम बंद कारणेविषयी अजूनही आदेश का दिले जात नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
या व्यावसायिक गाळ्यांमध्ये कधीही खानावळ नव्हती, ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चुकीची पडताळणी केली त्यांची चौकशी होऊन त्यांना खोटा अहवाल देऊन शासनाची दिशाभूल केल्यामुळे कठोर शिक्षा व्हावी, अशीही मागणी निवेदनात केली आहे. जर हे परमिटरूम या ठिकाणी सुरु झालेच तर कोणताही अनर्थ घडू शकतो. म्हणून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ या परमिटरूमचा परवाना रद्द करावा अशी विनंती संबंधितांनी केली आहे. निवेदन मनीषा महेंद्र देसले, पूजा जितेंद्र मराठे, वैशाली पवार, अनुपमा शिंदे, अलका शिंदे,जयश्री जाधव, शकुंतला निकम, सोनल पाटील, वंदना बेडसे, धनश्री शिंदे, सुरेखा देवरे, कल्पना पवार,कल्पना पाटील, प्रतिभा निकम, सुनंदा सूर्यवंशी, सुलभा जाधव,कविता महाजन यांनी आमदार गावीत यांना दिले.