जेवणात मुख्य घटक असलेल्या मिरचीला चवीसाठी महत्त्व आहे. लाल मिरचीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोडाईचाला आता मिरचीच्या कमतरतेमुळे अन्य ठिकाणाहून मिरची आयात करावी लागत आहे. दोंडाईचा येथून महाराष्ट्रसह परदेशात मिरचीपावडर निर्यात केली जात असे. प्रत्येक वर्षी मिरची कमी होणाऱ्या उत्पादनमुळे दोडाईचा शहरातील मिरची उद्योजक संकटात सापडले आहेत. कच्चा मालाचा कमतरतेमुळे मिरची उद्योगाला घरघर लागली आहे, तर त्या ठिकाणी असलेल्या अकुशल कामगारांना रोजगार मिळेनासा झाला आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या कोरोनाचा पहिल्या लाटेचा पण दुष्परिणाम मिरची उत्पादन व मिरची उद्योगावर झालेला दिसतो. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकावाचा परिणाम मिरची उत्पादनावर दिसतो. हवामानाचा परिणाम, मिरचीवर बुरशीजन्य रोग यांमुळे मिरची उत्पन्न कमी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची आवक असते. या परिसरात व्हीएन आर, फाफडा, स्पराइट, जरेला, पांडी, बंगारम, आदी मिरची प्रकारास पसंती आहे.
गृहिणी फाफडा, तर हॉटेल व इतर उद्योजक पांडी, जरेला, मिरचीला प्राधान्य देतात. त्यामानाने फाफडा मिरचीची लागवड पांडी, जरेला पेक्षा कमी असते. फाफडाला भाव जास्त असला तरी उत्पादन कमी असते. त्यामुळे काही उद्योजक जरेला फाफडात टाकून फाफडाचा नावाने मिरची व तिखट खपवितात. मिरची उत्पादनाचा -आवकचा आढावा घेतला असता मिरची उत्पादन - आवक यात घट होत असल्याचे दिसते. २०१८-१९ ला २० हजार १५३ क्विंटल मिरची उत्पादन झाले. त्यानंतर २०१९-२० ला १३ हजार ६७१ क्विंटल मिरची उत्पादन झाले, तर यावर्षी म्हणजे एप्रिल २०२० ते मार्च २०२१ यात फक्त ५ हजार ९२० क्विंटल मिरची उत्पादन झाले आहे. या वर्षी मागील वर्षापेक्षा २.२५ पट, तर दोन वर्षे पहिलेपेक्षा ३.४० पट उत्पन्न घटले आहे. दोडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची आवक होते. गुरुवारी आठवडे बाजारादिवशी मिरची आवक वाढते.
यावर्षी एका एकरात सुमारे सहा क्विंटल उत्पन्न आले आहे. कमी दर्जाच्या मिरचीला कमीत कमी १२०० ते चांगल्या मिरचीला जास्तीत जास्त ५४०० रु. भाव होता. यावर्षी सरासरी भाव ३२०० रुपये प्रति क्विंटल होता.
मिरचीचे उत्पन्न म्हणजे आवक कमी झाल्याने यावर्षी मिरची वाढली आहे. तिखट २७० ते २८० प्रति किलो विक्री होत आहे. महाराष्ट्रसह इतर राज्यात तसेच परदेशात मिरची निर्यात करणाऱ्या दोडाईचाला आता आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून मिरची आयात होत आहे. कमी मिरची उत्पादनामुळे शेतकऱ्यास जेमतेम पैसा मिळाला. कमी उत्पादनमुळे मिरची उद्योगावर आधारित उद्योगांना घरघर लागली. कुशल-अकुशल कामगारांना पाच-सहा महिने रोजगार मिळायचा, तो तीन-चार महिन्यांवर आला. कमी उत्पादनामुळे घरगुती व व्यावसायिक यांना जादा दराने मिरची व तिखट विकत घ्यावे लागत असल्याने मिरचीचा ठसका ग्राहकाला लागला आहे. विपरीत हवामान, कोरोनाच्या भीतीत मशागतीस मिळालेला कमी वेळ यातूनही उत्पादन कमी झाल्याचे शेतकरीचे म्हणणे आहे. एकंदरीत मिरचीला पण कोरोनाचा डंख लागल्याचे दिसत आहे. प्रतिक्रिया:1: अहमद गुलाम कादर- व्यापारी-गेल्या ३७-३८ वर्षांपासून मिरचीचा व्यापार करीत आहे. दोडाईचातून इतरत्र मिरची-तिखट विक्रीस पाठवितो. अकुशल मजुरांना यामुळे काही महिने रोजगार मिळतो. यावर्षी कोरोना किंवा इतर कारणामुळे मिरची उत्पन्न घटले आहे. २५ टक्के पण उत्पन्न नाही. उद्योगवर परिणाम झाला असून, मजुरांना पण काम नाही.
२-सलिम शेख-व्यापारी-सलग मिरची उत्पन्न कमी होत असल्याने मिरची उद्योग संकटात सापडला आहे. गुंटूर येथून मिरची आणावी लागते, वाहतूक व इतर खर्च वाढला आहे.
३-शांताराम पाटील- शेतकरी: बदलते हवामान, कोरोनाच्या भीतीमुळे मशागतीस कमी वेळ, मिरचीवर आलेला बुरशीजन्य रोग यामुळे मिरची उत्पन्न कमी झाले आहे. जेमतेम उत्पादन खर्च निघाला आहे. शासनाने मिरची उत्पादकांना मदत करावी.