पूर रेषा आखणीचा मार्ग होणार मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:15 IST2020-06-17T21:14:38+5:302020-06-17T21:15:02+5:30
पाटबंधारे विभाग : शंभर वर्षे वारंवारितेचा पूर विसर्ग अहवाल तयार, नकाशावरील शेरे पुर्तता प्रगतीत

dhule
सुनील बैसाणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील पाटबंधारे विभागाने केलेल्या नद्यांच्या पूर रेषेच्या सर्वेला तापी पाटबंधारे विभागाने मान्यता दिली आहे, अशी माहिती धुळे पाटबंधारे विभागाचे प्रकल्प शाखेचे शाखा अभियंता तुषार महाजन यांनी दिली़ नकाशांवरील शेरे पूर्ततेचे काम देखील प्रगतीपथावर असून येत्या महिन्याभरात प्रत्यक्षात पूररेषा आखणीचा मार्ग मोकळा होणार आहे़
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ९२ गावे पूररेषेत येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे़ भूतकाळात नद्यांना आलेल्या पुराच्या अनुभवावरुन जिल्हा प्रशासन दरवर्षी पूर रेषेतील गावांचा अंदाज जाहीर केला जातो़
परंतु पाटबंधारे विभागामार्फत तापी नदीतील विसर्ग आणि पांझरा नदीचे पाणी स्विकारण्याची तापी नदीची संभाव्य परिस्थिती, मागील २५ आणि १०० वर्षांचा पूर विसर्गाचा अभ्यास या बाबतीत अतीशय तांत्रिक आणि शास्त्रशुध्द निष्कर्ष काढण्यात आले आहेत़ त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या सर्वेनुसार पूर रेषा आखल्यानंतर जिल्हा प्रशासनाला प्रभावी उपाययोजना करणे सोपे जाणार आहे़
सारंग यादवडकर व इतरांनी नद्यांच्या काठावरील इमारतींच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने पूर रेषा आखणीबाबत चार सप्टेंबर २०१५ रोजी निकाला दिला होता़ त्यानुसार पूर रेषा आखणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने २७ मार्च २०१५ ला दिले होते़
दरम्यान, केंद्रीय जल आयोगाच्या २०१५ रोजीच्या प्रकाशित पूर अहवालातील मार्गदर्शक तत्वानुसार आणि नर्देशानुसार २५ वर्षे व १०० वर्षांच्या वारंवारितेचा पूर विसर्गाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना नाशिक येथील मेरीच्या महासंचालकांनी १६ नोव्हेंबर २०१५ च्या पत्रान्वये दिल्या होत्या़
त्यानुसार धुळे पाटबंधारे विभागाने धुळे जिल्ह्यातील पांझरा नंदीसह इतर नद्यांचा २५ वर्षे व १०० वर्षे वारंवारितेचा पूर विसर्गाचा अभ्यास पूर्ण केला आहे़ या अभ्यासाला तापी पाटबंधारे महामंडळाने मान्यता दिली आहे़ मान्य पूर विसर्गानुसार लाल व निळी पूररेषा नकाशावर आखणी करुन नकाशे सक्षम स्तरावर मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत़ अभ्यासाच्या अनुषंगाने लाल आणि निळी पूररेषा आखणी केलेल्या नकाशांवरील शेरे पूर्तता प्रगतीपथावर आहे़ पूर रेषेच्या नकाशांना येत्या एक ते दीडे महिन्यात मंजूरी मिळण्याची शक्यता आहे़ त्यानंतर प्रत्यक्ष नद्यांच्या कार्यक्षेत्रावर मार्किंग व दगड लावून सिमांकनाचे काम करण्यात येणार आहे़
भूतकाळात आलेल्या पुरांच्या अनुभवानुसार जिल्हा प्रशासनातर्फे पूररेषेतील गावांची यादी जाहीर केली जात होती़ त्यानुसार उपाययोजना केल्या जात होत्या़ परंतु आता शास्त्रशुध्द आणि तांत्रिक अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारित सुधारित पूररेषा आखली जाणार असल्याने पुराच्या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना करणे जिल्हा प्रशासनाला सोपे जाणार आहे़