लष्करी जवान चंदू चव्हाणचा डॉ.भामरे यांच्या प्रचारात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:03 IST2019-04-22T13:01:24+5:302019-04-22T13:03:29+5:30
आदेशाचा भंग, निवडणूक निर्णय अधिका-यासह आयोगाकडे तक्रार : अनिल गोटे यांची पत्रकार परिषदेत माहिती

लष्करी जवान चंदू चव्हाणचा डॉ.भामरे यांच्या प्रचारात सहभाग
लोकमत आॅनलाईन
धुळे : शत्रू राष्टÑात आश्रयास गेलेल्या चंदू चव्हाण यास भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी आपल्या निवडणूक प्रचारात सहभागी करून घेतले. जामफळ येथे आयोजित पक्षाच्या कार्यक्रमातही त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. ९ रोजी झालेल्या डॉ.भामरे यांच्या शक्तीप्रदर्शन रॅलीतही तो सहभागी झाला होता.याबाबत आपण निवडणूक निर्णय अधिकारी व केंद्र, राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे, अशी माहिती धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.
पुलवामा अतिरेक्यांचा हल्ला, त्यात ४४ जवानांना पत्करावे लागलेल्या हौतात्म्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सैन्याच्या गणवेशाचा वापरही नियमबाह्य व बेकायदेशीर मानला आहे. तसेच सेनेमध्ये कार्यरत कुठल्याही जवानाचा प्रचारात वापर करणे किंवा सहभागी करून हा गंभीर गुन्हा असल्याच्या सूचना व सैन्याचा वापर केल्यास उमेदवारास गंभीर स्वरुपाचे परिणाम भोगावे लागतील, अशी सक्त ताकीद आयोगाने दिली आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ.भामरे यांनी आयोगाच्या सर्व सूचनांची पायमल्ली केली असून त्याची रितसर तक्रार आपण निवडणूक निर्णय अधिकारी व आयोगाच्या आयुक्तांकडे केल्याचे गोटे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत यावेळी तेजस गोटे, दिलीप साळुंखे, हिंमत पवार, प्रशांत भदाणे आदी उपस्थित होते.
व्हॉट्सअपनेही प्रचार
एवढेच नव्हे तर चंदू चव्हाण याच्या व्हॉट्सअप अकौंटवरून डॉ.भामरे यांना मतदान करून निवडून आणावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्याचा डॉ.भामरे यांनी इन्कारही केलेला नाही. तक्रारीसोबत पुराव्यादाखल चित्रफीत व चंदू चव्हाण यांच्या व्हॉट्सअप अकौंटवरील प्रिंट आऊटची प्रत देखील जोडली आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू असताना संरक्षण राज्यमंत्री पदावर असताना डॉ.भामरे यांनी केलेले हे कृत्य गंभीर आहे. ते लक्षात घेऊन त्यांची उमेदवारी रद्दबातल ठरविण्याची शिफारस करावी, अशी मागणीही आपण निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावारांकडे केल्याचही त्यांनी यावेळी सांगितले.