गजानन महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:10 IST2020-02-10T23:09:38+5:302020-02-10T23:10:28+5:30
भक्तीपूर्ण वातावरण : अनेक भाविकांनी घेतले दर्शन, सायंकाळी झाला समारोप

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :गजानन महाराजांचा जयघोष करीत निघालेल्या पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला़ यावेळी भजन आणि मुलांच्या लेझिम नृत्यामुळे भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ बालाजी मंदिरापासून निघालेल्या या पालखीचा समारोप वाडीभोकर रोडवरील मंदिरात करण्यात आला़
वाडीभोकर रोडवर रामनगर परिसरात गजानन महाराजांचे मंदिर आहे़ दरवर्षाप्रमाणे यंदाही महाराजांचा प्रगट दिनाचा सोहळा १५ फेब्रुवारी रोजी श्री सदगुरु गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे़ त्या दिनाचे औचित्यसाधून महाराजांच्या मुखवट्याची पालखी काढण्यात येत असते़ दरवर्षी हा उपक्रम होत असतो़ यंदाही हा उपक्रम सोमवारी पार पडला़ शहरातील खोलगल्ली भागात असलेल्या बालाजी मंदिरापासून गजानन महाराजांच्या मुखवट्याची पालखी सकाळी काढण्यात आली़ तत्पुर्वी बालाजी मंदिरात निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली़ यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव केले सपत्नीक आणि मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते़ पुजा केल्यानंतर बालाजी मंदिरापासून पालखीला सुरुवात करण्यात आली़ पालखीच्या अग्रभागी हत्ती त्यानंतर मुलांचे लेझिम नृत्य, वारकऱ्यांचे भजनी मंडळ आणि वाद्यवृंद असल्यामुळे पालखी सोहळा देवपुर भागात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले़
बालाजी मंदिरापासून निघालेली ही पालखी पुढे महात्मा गांधी पुतळा, मोठा पुल, पंचवटी, नेहरु चौकाकडून पुढे वाडीभोकर रोडने स्टेडीअममार्गे रामनगर भागात असलेल्या गजानन महाराजांच्या मंदिरात पालखीचा समारोप करण्यात आला़