तिसऱ्या लाटेच्या तोंडावर ऑक्सिजन प्रकल्प रखडला, हिरे रुग्णालयातील प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यास शासनाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST2021-07-29T04:35:36+5:302021-07-29T04:35:36+5:30
धुळे : कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग असलेल्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना हिरे रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प प्रशासकीय ...

तिसऱ्या लाटेच्या तोंडावर ऑक्सिजन प्रकल्प रखडला, हिरे रुग्णालयातील प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यास शासनाचा नकार
धुळे : कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग असलेल्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना हिरे रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प प्रशासकीय मान्यतेअभावी रखडला आहे. प्रकल्प उभारणीचा खर्च, देखभाल दुरुस्तीच्या तुलनेत त्याची उपयोगिता कमी असल्याचे कारण देत शासनाने प्रशासकीय मान्यता देण्यास नकार दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसे पत्र जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झाले आहे. या वृत्ताला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाने दुजोरा दिला आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती देण्यास संबंधित विभागाने नकार दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला हाेता. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव जाऊ नये यासाठी ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली. त्यासाठी शासनाने आमदार, खासदारांना कोरोनाचा विशेष निधीही दिला. त्यातून खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी हिरे रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी १ कोटींचा निधी दिला. तसे रीतसर पत्र व धनादेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. परंतु प्रशासकीय मान्यता देण्यास शासनाने नकार दिला आहे. प्रकल्प उभारणीचा खर्च, वीजबिल, देखभाल दुरुस्ती आदी खर्चाच्या तुलनेत प्रकल्पाची उपयोगिता कमी असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. तसे पत्र जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झाले आहे. परंतु, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी याबाबत माहिती देणे टाळले. खासदार सुभाष भामरे यांना आम्ही माहिती दिली असून तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या, असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, प्रशासकीय मान्यता मिळाली तर आम्ही प्रकल्प उभारणीसाठी त्वरित कार्यारंभ आदेश देऊ, अशी माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली. खासदार डाॅ. भामरे हे संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
खासदारांच्या एक कोटी निधीतून उभारण्यात येणाऱ्या नियोजित ऑक्सिजन प्रकल्पाला आता प्रशासकीय मान्यतेअभावी ब्रेक लागला आहे. नियोजन विभागाने निधी थांबविला आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सकांनीदेखील निविदा प्रक्रिया थांबविली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऑक्सिजन प्रकल्पाबाबत जिल्हा नियोजन विभागाला कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. या विषयासंदर्भात खासदारांना माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा. प्रकल्पाबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना मार्गदर्शक सूचना प्राप्त होतात. - ममता हटकर, जिल्हा नियोजन अधिकारी
खर्चाच्या तुलनेत उपयोगितेचा प्रश्न
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतदेखील गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाने पार पाडली. या रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक आहे. परंतु ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या बाबतीत खर्च आणि उपयोगिता यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकल्पाच्या ऐवजी ऑक्सिजन टॅंक हा पर्याय उत्तम असल्याचे शासनाने सुचविल्याची माहितीही मिळाली आहे.