स्टेरॉइड, सीटीस्कॅनचा अतिमारा ठरतोय कोरोना रुग्णांना घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST2021-05-05T04:58:55+5:302021-05-05T04:58:55+5:30
धुळे : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सध्या तीव्र झाली आहे. तसेच स्टेरॉइड व सीटीस्कॅनचा अतिवापर केल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ...

स्टेरॉइड, सीटीस्कॅनचा अतिमारा ठरतोय कोरोना रुग्णांना घातक
धुळे : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सध्या तीव्र झाली आहे. तसेच स्टेरॉइड व सीटीस्कॅनचा अतिवापर केल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये दुष्परिणाम दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांना न्यूकरमायसेस या बुरशीजन्य आजाराची लक्षणे दिसत आहेत.
एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना वेगळी लक्षणे जाणवत असल्याने चिंता वाढली आहे. स्टेरॉइड तसेच रेमेडिसिविर इंजेक्शनचा अतिवापर कोरोनाबाधित रुग्णांसाठी घटक ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येक रुग्णाला रेमेडिसिविर इंजेक्शनची गरज नसते. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत किंवा कोणतेही लक्षणे नाहीत अशा रुग्णांना स्टेरॉईडचीही गरज पडत नाही. त्यामुळे कोरोना झाला म्हणजेच रेमेडिसिविर इंजेक्शन देण्याची गरज नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जास्त क्षमतेची इंजेक्शने व औषधांमुळे त्रास उद्भवू शकतात त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे जिवावर बेतू शकते.
बुरशीजन्य आजाराचा धोका -
गरज नसताना औषधे दिल्याने तसेच औषधांच्या अतिवापराने बुरशीजन्य आजाराचा धोका वाढला आहे. रेमेडिसिविर तसेच स्टेरॉइडचा अतिवापर केल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये न्यूकरमायक्रोसेस हा बुरशीजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात जबडा दुखणे, दातांना बुरशी लागण्यासारखे दिसणे अशाप्रकारचे त्रास होत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसत आहेत.
५० टक्क्यांनी वाढले सिटीस्कॅन एचआरसीटी -
धुळे शहरात खासगी डायग्नोस्टिक सेंटर व खासगी रुग्णालयात असलेले एकूण १५ डायग्नोस्टिक सेंटर आहेत. कोरोना काळापूर्वी जिल्ह्यात महिन्याला सरासरी चार ते पाच हजार सिटी स्कॅन व्हायचे अशी माहिती मिळाली. मात्र आता एका महिन्यात होणाऱ्या एचआरसीटी स्कॅनची संख्या ५० टक्क्यांनी वाढली आहे. सध्या एका महिन्यात सरासरी १० हजार सिटीस्कॅन होत आहेत.
एक सीटीस्कॅन म्हणजे ८० ते १४० एक्स-रे -
कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रत्येक रुग्णाने सिटीस्कॅन करणे गरजेचे नसल्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. एक सिटीस्कॅन करणे म्हणजे ८० ते १४० एक्स-रे काढण्यासारखे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुन्हा पुन्हा सिटीस्कॅन केल्याने दीर्घकालीन व्याधी जडू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सिटीस्कॅन करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये न्यूकरमायक्रोसेस या बुरशीजन्य आजाराची लक्षणे दिसली आहेत. स्टिरॉइडचा अतिवापर तसेच गरज नसताना रेमेडिसिविर घेतल्याने अशाप्रकारचे त्रास उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे गरज नसेल, तर स्टेरॉइड घेऊ नये. तसेच प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला रेमेडिसिवीर इंजेक्शनची आवश्यकता नसते. त्यासाठीही बाधित रुग्णांनाना आग्रह करू नये.
- डॉ. विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी