आत्मविश्वासाच्या बळावर भावंडाची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST2021-05-18T04:37:19+5:302021-05-18T04:37:19+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत येथील, एकत्रित कुटुंबातील वरिष्ठ वीज यंत्र चालक तुकाराम पांडुरंग माळी व सैन्य दलातून निवृत्त झालेले ...

आत्मविश्वासाच्या बळावर भावंडाची कोरोनावर मात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत येथील, एकत्रित कुटुंबातील वरिष्ठ वीज यंत्र चालक तुकाराम पांडुरंग माळी व सैन्य दलातून निवृत्त झालेले भगवान पांडुरंग माळी यांना कोरोनाची लागण झाल्याने कुटुंबात नीरव शांतता पसरली. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती, उपचाराची योग्य दिशा, संकट काळात मित्रांनी दिलेली ऊर्जा व नातेवाइकांच्या विशेष सहकार्यामुळे कोरोनावर सहज मात केल्याचे या भावंडांनी सांगितले.
तुकाराम माळी (४८) यांना ताप आल्याने, गावात प्रथमोपचार केले. मात्र, फरक पडला नाही. त्यांनी दोंडाईचा येथे एच.आर.सी.टी. केले असता स्कोअर १९ आला. रक्त तपासणी केल्यानंतर सी.आर.पी. १३.७ निघाला. मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजन तपासणी केली असता, अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने होम क्वांरटाइन होऊन घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार सुरू केले. मात्र, नंतर श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांना नंदुरबारला हलविले. तेथे ॲाक्सिजनची पातळी ८० पर्यंत खालावली. प्रकृती खालावल्याने, त्यांना सुरतला नेले. इकडे भाऊ भगवान माळी यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. एक भाऊ सुरत, तर दुसरा दोंडाईचाला दाखल असताना कुटुंबीयांत धास्ती पसरली. यादरम्यान मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले होते. यावेळी मोठ्य़ा संकटाचा सामना करत वृद्ध आईला धीर देत मित्र परिवाराने सावरले. दरम्यान घरात लहान मुलांचे चेहरे पाहवत नव्हते; परंतु आत्मविश्वास, योग्य उपचारामुळे दोन्ही भावंडांनी कोरोनावर यशस्वी मात केली.