थाळनेर परिसरातील उसावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:38 IST2021-08-23T04:38:49+5:302021-08-23T04:38:49+5:30
बदलत्या हवामानामुळे परिसरातील ऊस या पिकावर विविध रोगाच्या प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कीड व्यवस्थापन ...

थाळनेर परिसरातील उसावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव
बदलत्या हवामानामुळे परिसरातील ऊस या पिकावर विविध रोगाच्या प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कीड व्यवस्थापन कार्यक्रम, कृषी विषयक नियोजन व सल्ले यांच्या अभावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना या रोगांवर वेळेवर आवश्यक ते उपाययोजना करता न आल्यामुळे त्यांच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने कृषी विभागाने उसावरील लोकरीमावा व पांढरी माशी यांच्यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.
थाळनेरसह परिसरातील खांडवा व लावणीच्या उसावर लोकरीमावा व पांढरी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. या रोगांचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने उसाचे पीक अगोदर पांढरे व पिवळे होते. त्यानंतर उसाचा मधला पोगा कोरडा पडतो. तो पोंगा सहज हाताने ताणला तरी हातात निघून येतो. परिसरातील ऊस या पिकावर हे प्रमाण अधिक प्रमाणात वाढत जाऊन पूर्ण शेतातील उसाचे उभे पीक कोरडे पडते. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे.
थाळनेर परिसर तापी नदीच्या काठावर असल्यामुळे परिसरातील शेतामधील ट्युबवेलची पाण्याची पातळी बऱ्याच प्रमाणात असते. म्हणून परिसरातील बरेचसे शेतकरी उसाची लागवड करण्याचे पसंत करतात. परिसरातील बरेचसे शेतकऱ्यांनी आता उसाची लागवड करण्याकडे नापसंती दर्शविलेली दिसून येत आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी उसाची लागवड केलेली असून त्या उसावर लोकरी मावा व पांढरी माशीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने परिसरातील बरेचसे शेतकऱ्यांचे उसाचे पूर्ण शेत निकामी झाल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी या रोगांचा बंदोबस्तासाठी अनेक उपाय करूनदेखील काहीही उपयोग झालेला नाही. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाअभावी यश येत नाही तसेच मागील वर्षीदेखील परिसरातील उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सध्या दोन ते तीन वर्षांपासून सतत दुष्काळी वर्ष येत असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढून शेती करावी लागत आहे. परिसरातील उसावर आगमन झालेल्या लोकरी मावा व पांढरी माशीचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.