जयघोषाने अवघी आमळी नगरी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:40 IST2019-11-08T22:39:48+5:302019-11-08T22:40:36+5:30
कन्हैय्यालाल महाराज यात्रोत्सव : पहिल्या दिवशी हजारो भाविकांकडून दर्शन, परराज्यातूनही हजेरी

dhule
दहिवेल : कार्तिकी एकादशीनिमित्त साक्री तालुक्यातील आमळी येथे श्री कन्हैय्यालाल महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी अपूर्व उत्साहात सुरूवात झाली. कन्हैय्यालाल महाराजांच्या जयघोषाने पहिल्याच दिवशी आमळी नगरी दुमदुमली. संपूर्ण खान्देशसह राज्यभरातून तसेच मध्यप्रदेश, गुजरात राज्यांमधूनही भाविकांनी हजेरी लावली आहे.
शुक्रवारी सकाळी ७ वाजता महापूजा, आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
यात्रोत्सवात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. त्यामुळे मंदिर परिसरासह दूर दूरवरुन आलेल्या भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरासह यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गर्दीमुळे हॉटेल सजली असून पाळणे, लोकनाट्य (तमाशा), खेळांचे साहित्य व फळांच्या दुकानांवरही गर्दी दिसत आहे.
वाहने उभी करण्यासाठी (पार्किंग) व्यवस्था करण्यात आली आहे. मंदीर समितीच्यावतीने सर्व जय्यत तयारी करण्यात आली असून तीन दिवस यात्रोत्सव सुरूच राहणार आहे. यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सकाळी प्रतिष्ठीत नागरिकांनी श्री कन्हैय्यालाल महाराजांचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाची पाहणी केली. भाविकांसाठी रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सर्वांना सुरळीत दर्शन झाले.
प्रसादाकरीता हजारो नारळांची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. खजुराचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. श्रद्धेमुळे आदिवासी समाजबांधवांकडून मंदिर परिसरात रात्रभर भजनांचा कार्यक्रम सुरू असतो.
परिसरातील दिंड्याही पोहचत असल्याने रात्रभर मंदीर परिसरात जागरणाचा कार्यक्रम सुरू असतो. यात्रोत्सवात वीज वितरण कंपनी, पोलीस आदी विभाग कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशीरापर्यंत दर्शन सोहळा सुरू होता.