धुळे : राज्य शासनाने खासगी शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी पदाबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा, १ जानेवारीपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्यावतीने बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी संघटनांची समन्वय समिती यांच्यामार्फत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देण्यात आले.राज्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी संदर्भात ११ डिसेंबर २०२० रोजी आकृतीबंधाचा शासन निर्णयाअन्वये विद्यमान कार्यरत पदावरील शिपाई संदभार्तील शिक्षकेतर पदे व्यपगत करण्यात येणार असून सद्याच्या रिक्त पदांसाठी नियमित वेतन व भत्ते न देता प्रत्येक पदासाठी दरमहा ठोक स्वरुपात मासिक शिपाई भत्ता संस्थेला वेतनेतर अनुदानातून देण्याच्या निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने एप्रिल २०१९ पासून करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णय घाई गर्दीत आला असून या शासन निर्णयामुळे राज्यातील जवळपास ५२ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदावर गदा येणार आहे.भविष्यात शाळेची घंटा कोण वाजवणार, हा प्रश्न या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात उपस्थित होत आहे. शाळेच्या वर्गखोल्या, शालेय परिसर, स्वच्छता या सारख्या अनेक प्रकारचे प्रश्न भविष्यात उपस्थित होणार आहेत.मुळात शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र असून या क्षेत्रात ज्ञानदानाचे महान कार्य करण्यात येते. शाळेचा कणा असलेला शिक्षकेतर सेवक - सेविका यांच्या पदावरच शासनाने घाला घातला असून त्याविरोधात शिक्षण क्षेत्रात काम करणारे कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात तीव्र असंतोष आहे.विविध मागण्यांमध्ये ११ डिसेंबर २०२० रोजीचा आकृतीबंधचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गणवेश धुलाई भत्ता नियमित वेतनात समावेश करण्यात यावा, शिक्षकेतरांच्या पदासाठी चिपळूणकर समिती शिफारशी पूर्ण लागू करणे, शिक्षकेतर कर्मचारी यांना सलग २४ वषार्नंतरची दुसरी कालबध्द पदोन्नती लागू करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी व्ही. एम. भामरे, हर्षल पवार, सी. टी. पाटील, संजय पवार, महेश मुळे, व्ही. टी. गवळे, जे. बी. सोनवणे, मंगला बडगुजर, यू. डी. तोरवणे, आयुबखान पठाण, जी. एस. वाघ, श्याम पाटील, रियाज अन्सारी, क्रांती सिंग, बी. बी. सयाईस, सी. डी. पाटील, एस. एम. पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होेते.
अन्यथा, १ जानेवारीपासून बेमुदत शाळा बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 21:37 IST