उद्यापासून चार वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:26 IST2020-07-04T21:26:20+5:302020-07-04T21:26:42+5:30
जिल्हाधिकारी। अंमलबजावणीसाठी झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती

dhule
धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुकानांची वेळ एक तासाने कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ सोमवारपासून दुपारी चार वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जारी केले आहेत़ अंमलबजावणीसाठी झोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सायंकाळी चार ते सकाळी सहापर्यंत संपूर्ण संचारबंदीच्या सूचना आहेत़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. त्याबरोबरच मिशन बिगिन अगेन राबवीत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र, धुळे महानगरपालिका क्षेत्रात व्यापारी व नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका क्षेत्रात सोमवारपासून वैद्यकीय व अति तातडीच्या शासकीय सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना व सेवा दुपारी चार वाजताच बंद होतील. वैद्यकीय व आपत्कालीन अत्यावयशक सेवा वगळून दुपारी ४ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी राहील़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगिन अगेनसाठी निर्धारित केलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता आहे. महानगरपालिका क्षेत्रात राजपत्रित दर्जाचे झोनल अधिकारी नियुक्त करून मिशन बिगिन अगेनची शासन नियमाप्रमाणे प्रभावी अंमलबजावणी होते किंवा कसे याची वेळोवेळी पाहणी करून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून दर तीन तासाला अहवाल अपर तहसीलदार, धुळे व प्रांत अधिकारी, धुळे यांना सादर करणार, असा निर्णय महानगरपालिका प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारपासून या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
संबंधित झोनल अधिकारी धुळे महानगरपालिका क्षेत्रात ठरवून दिलेल्या वेळी दुकाने चालू आहेत किंवा नाही, नागरिक मास्कचा वापर करीत आहेत की नाही, सॅनिटायझर वापर, वाहतूक नियंत्रण आदींचे व्हीडिओ चित्रीकरण करून प्रशासनास सादर करतील. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या बाबतीत सर्व नागरिक आस्थापना व सेवा पुरविणारे व्यापारी यांनी प्रशासनास सहकार्य करणे अभिप्रेत आहे.
नियम मोडणाºयांवर कारवाईचा इशारा
दुकानदार आणि नागरिकांनी प्रशासनास सहकार्य न केल्यास व कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ झाल्यास यापेक्षाही कठोर कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे़