रेशनधारकांना तांदूळ वाटप करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 22:30 IST2020-04-08T22:30:00+5:302020-04-08T22:30:15+5:30
आमदार कार्यालयात निर्णय : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोफत धान्य वितरण

dhule
धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा लॉकडाऊन केला आहे़ त्यामुळे अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे़ उपासमारीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेला स्वस्त धान्य लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसात वितरीत करा अशा सुचना आमदार डॉ़ फारूख शाह यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात़
आमदार डॉ़ फारूख शाह यांच्या कार्यालयात सोमवारी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ यावेळी अप्पर तहसीलदार शहर संजय शिंदे, अव्वल कारकून निलेश सांगळे, डॉ. दिपश्री नाईक, डॉ. बी. यु. पवार, आशिष सोनार, हाजी कलीम शाह, सेहबाज शाह, निलेश काटे, वसीम अक्रम, एजाज सय्येद आदी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे़ त्यामुळे हात मजूर व कष्टकरी कुटुंबाला उपासमारीला सामोरे जावे लागत आहे़ नागरिकांना पुरेसा प्रमाणात धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आमदार डॉ. फारूक शाह यांच्याकडे प्राप्त होत आहे़ तक्रारीची दखल घेऊन आमदार डॉ. शाह यांनी नागरिकांना मोफत धान्याचे वितरण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी केली़ त्यानुसारतातडीने दखल घेत जिल्हाधिकारी तसेच अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी आमदार डॉ. शाह यांची भेट घेऊन समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले़ प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी येत्या २ ते ३ दिवसात प्रती सदस्य ५ किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये मोफत वितरण करणार आहेत. तसेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालयातर्फे धान्याचे वितरण १५ एप्रिल पासून स्वस्त धान्य दुकानातुन केले जाणार आहे़ त्यामुळे गरीब व गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे़