विरोधकांनी जि.प.त सत्तांतराची स्वप्ने पाहू नयेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST2021-03-14T04:31:49+5:302021-03-14T04:31:49+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या ...

विरोधकांनी जि.प.त सत्तांतराची स्वप्ने पाहू नयेत
जिल्हा परिषद, पंचायत समितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या निर्णयामुळे धुळे जि.प.तील १५ व पंचायत समितीच्या ३० अशा एकूण ४५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी संभाव्य पोटनिवडणूक, रणनीती याबाबत जि.प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्वच प्रश्नांची समर्पक उत्तरे देत विरोधकांचाही समाचार घेतला. त्यांच्याशी झालेला संवाद प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असा...
प्रश्न - न्यायालयात भूमिका मांडली का?
डॉ. रंधे - सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचा आम्ही सन्मान करतो. न्यायालयाच्या निर्णयामुळे ४५ जणांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. जि.प.च्या वतीने आम्हीही पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे. त्याची सुनावणी पुढील आठवड्यात होईल. काय निर्णय लागतो याची प्रतीक्षा आहे.
प्रश्न - पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली का?
डॉ. रंधे - निवडणूक आयोगाने अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. मात्र, पोटनिवडणूक लागल्यास आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू.
प्रश्न - सर्व जागांवर विजयाची खात्री आहे का?
डॉ.रंधे - भाजपच्या ज्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झालेले आहे, ते सर्व ४-५ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेले होते. त्यामुळे त्या जागांवर आमचा विजय निश्चित आहे. मात्र, गेल्या वेळी ज्या जागांवर आमचा पराभव झाला त्या जागाही आम्ही जिंकू.
प्रश्न - जि.प.त सत्तांतर होईल, असे विरोधक म्हणत आहेत?
डॉ. रंधे - विरोधकांकडे अगोदरच संख्याबळ कमी आहे. पोटनिवडणुकीतही भाजपचा विजय निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषद भाजपच्याच ताब्यात राहणार आहे. विरोधकांनी जिल्हा परिषदेत सत्तांतराचे स्वप्न पाहू नये.
प्रश्न - कुठल्या बळावर आपल्याला विजयाची खात्री आहे?
डॉ. रंधे - आम्हाला जि.प. सत्तेत येऊन वर्षाचाच कालावधी झालेला आहे. वर्षभरात अनेक विकासकामे केली आहेत. या कामांची पावती आम्हाला पोटनिवडणुकीत निश्चितच मिळेल.
प्रश्न - महाविकास आघाडीचा काही परिणाम होईल का?
डॉ. रंधे - महाविकास आघाडीचा भाजपवर कुठलाच परिणाम होणार नाही. नागारिकांचा भाजपवरच विश्वास आहे.