सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 13:37 IST2020-02-05T13:37:37+5:302020-02-05T13:37:54+5:30
अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश

सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा
आॅनलाइन लोकमत
धुळे : अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविका यांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन थकले होते. मात्र हे थकीत मानधन तसेच वाढीव थकबाकी तातडीने मिळणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.
बालकांना सदृढ आरोग्य सेवा देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी ग्रामीण भागात बालकांना लहानपणापासूनच अंगणवाडीत दाखल केले जाते. अंगणवाडीमध्ये महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, तसेच माता-बालक यांच्या आरोग्य, आहार व कुपोषण या अन्य बाबीकडे लक्ष पुरविणे अशा कार्याचा समावेश अंगणवाडीमध्ये होत असतो. शिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे. ग्रामीण अथवा दुर्गम भागातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा अंगणवाडीतूनच होत असतो.
धुळे जिल्ह्यात २,१०४ अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची व मदतनीसांची प्रत्येकी १९१३ पदे मंजूर आहेत. तर मिनी अंगणवाडी सेविकांची १९१ पदे मंजूर आहेत. अंगणवाडीसेविकांना आठहजार, मिनीसेविकांना ५ हजार ७५० तर मदतनीसांना ४ हजार २५० रूपये मानधन मिळत असते.
राज्यातील सर्व अंगणवाडीसेविकांचे नोव्हेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या तीन महिन्यांचे मानधन थकले आहे.
यासंदर्भात महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची मंत्रालयात भेट घेतली.
यात नोव्हेंबर २०१९ पासूनचे थकीत मानधन आणि आॅक्टोबर २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीतील मानधनवाढीची थकीत रकमेचा मंजूर झालेला निधी विनाविलंब वितरीत करून त्वरित मानधन देण्यात यावे अशी मागणी केली.
थकीत मानधनाची रक्कम येत्या आठवड्याभरात बॅँक खात्यात जमा करण्यात येईल. मानधनवाढीची थकीत रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. थकबाकीची रक्कमही त्वरित अदा केली जाईल असे सांगण्यात आले. तसेच दहमहा पाच तारखेला मानधन मिळण्यासाठी वित्त व नियोजन विभागाशी चर्चा करण्यात आली असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल असे यशोमती ठाकूर यांनी शिष्टमंडळास सांगितले.
या शिष्टमंडळात माया परमेश्वर, रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे यांचा समावेश होता.
दरम्यान थकीत मानधन मिळणार असल्याने अंगणवाडीसेविका, मदतनीस यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.