खुल्या जागाचे आरक्षण अमान्यचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:01 IST2020-02-04T12:00:41+5:302020-02-04T12:01:01+5:30
आखाडे ग्रामपंचायत : आरक्षण सोडतीत दोन्ही सर्वसाधारण जागा महिलांसाठी निघाल्याने घेतला निर्णय

खुल्या जागाचे आरक्षण अमान्यचा ठराव
आॅनलाइन लोकमत
निजामपूर (जि.धुळे) :साक्री तालुक्यातील आखाडे ग्रामपंचायतीचे नुकतेच आरक्षण काढण्यात आले. यात खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा असून, दोन्ही जागा या स्त्रियांसाठी राखीव आहेत. त्याऐवजी एक जागा सर्वसाधारण गटातील पुरूषांसाठी असावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान खुल्या प्रवर्ग आरक्षण अमान्य असल्याचा ठराव विशेष ग्रामसभेत करण्यात आला आहे. ठरावाची प्रत तहसीलदारांना देण्यात आली.
३ फेब्रु.रोजी आखाडे ग्रामपंचायत कार्यालयात गट विकास अधिकारी यांच्या पत्रांनुसार दुपारी विशेष ग्रामसभा सरपंच श्रावण भवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. साक्री तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी उमेदवार आरक्षण वाचन केले. यावेळी नायब तहसीदार विनोद ठाकूर हेदेखील ा उपस्थित होते.
एकूण ३ प्रभागात ९ जागा आहेत. अनु.जमाती ४ जागा (२ पु.आणि २ स्त्री),अनु.जाती १ जागा पुरुष, नागरिकांचा मागास प्रवर्गच्या दोन जागा(१ पु.आणि १ स्त्री), तर सर्वसाधारण दोन जागा आहेत. दरम्यान प्रभाग १ व तीन मधील ज्या दोन सर्वसाधारण जागा आहे. त्याचे आरक्षण स्त्रियांसाठी निघाले आहे. नेमकी या बाबत हरकत घेण्यात आली. यापैकी एक जागा पुरुष उमेदवारासाठी असावी असे उपसरपंच शिवलाल ठाकरे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
ज्यांच्याडे जातीचा दाखला नाही अश्या व्यक्तीस उभे राहण्यासाठी खुल्या प्रवर्गाची एकही जागा नसल्याने तो अन्याय ठरतो.
या ग्रामसभेत खुल्या प्रवर्गाचे आरक्षण अमान्य असल्याचा ठराव झाला. उपसरपंच शिवलाल ठाकरे,सदस्य,ग्रामसेवक महारु गायकवाड, ग्रामस्थ हजर होते.विशेष सभा ठराव प्रत दुपारी साक्री येथे तहसीदार याना देण्यात आली.