मंदिरात केवळ पूजा होणार, दर्शन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:32 IST2020-06-30T22:31:48+5:302020-06-30T22:32:11+5:30
आषाढी एकादशी : परंपरेनुसार केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार, यात्रोत्सवही रद्द

dhule
धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूिमवर आषाढी एकादशीनिमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असून, मंदिरांमध्ये केवळ विठूरायांची पूजा होणार आहे.आषाढीनिमित्त जिल्ह्यात होणारे यात्रोत्सवही रद्द केलेले आहेत. वारकरी घरीच विठू रायाचे नामस्मरण करणार आहे.
धुळे
शहरातील मालेगाव रोडवरील दसेरा मैदानाजवळ जुन्या काळातील विठ्ठलाचे मंदिर आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर हे मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे. मात्र आषाढीच्या दिवशी पहाटे पाच वाजेच्या सुमारास केवळ घरगुती स्वरूपात विठ्ठल-रूख्मिणीची पूजा करण्यात येणार आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांनी घरूनच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे अशी विनंती मंदिराचे प्रमुख कौशिक गानू यांनी सांगितले.
दरम्यान आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांनी गर्दी करू नये म्हणून मालेगावरोडवरील अग्रेसेन चौकात तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोलीस प्रशासनातर्फे मंदिर बंद असल्याचा मोठा फलक लावला आहे.
दरम्यान मंदिर परिसरात दरवर्षी यात्रोत्सव होत असतो. मात्र यंदा आषाढीचा उत्सवच नसल्याने यात्रोत्सवही रद्द झाला आहे. त्यातून होणारी उलाढालही ठप्प झालेली आहे.
कापडणेचा पालखी सोहळा रद्द
कापडणे येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दरवर्षी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यंदा मात्र, कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. तसेच पालखी सोहळाही रद्द झालेला आहे.
आषाढीच्या दिवशी केवळ चार ते पाच लोकांच्या उपस्थितीत पूजा विधी करून पालखी देखील मंदिराच्या सभा मंडपात फिरवून जागीच ठेवली जाणार आहे. भाविकांनी मात्र, मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आलेले आहे.
बाळदे येथील यात्रोत्सव रद्द
उंटावद : शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या पांडूरंगाची यंदाच्या वर्षी होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आलेला आहे़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़ याठिकाणी खान्देशातून भाविक येत असतात़
यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे़ त्यामुळे यात्रोत्सवात येणारे भाविक, व्यवसाय, दुकानदार, पूजा-पत्री, विकणारे, आदी व्यवसायिकांनी यात्रेला येऊ नये. तसेच या दिवशी श्री पांडुरंगाची नित्यनेमाने पूजा, काकडा आरती, अभिषेक हे धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होईल. भाविकांनी घरीच पांडुरंगाचे नामस्मरण करावे असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हभप तथा माजी आमदार संभाजीराव हिरामण पाटील, मनोहर पाटील, निलेश पाटील यांनी केले.
बभळाज येथील मंदिर सजले
बभळाज :शिरपूर तालुक्यातील बभळाज येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमिवर येथील श्रीविठ्ठल रूख्मिणी मंदिरात पूर्व तयारी करण्यात आली असून, ध्वजपताका लावून मंदिर सजविण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोणत्याही कार्यक्रमाशिवाय आषाढी एकादशी साजरी होणार आहे.
या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आठ वर्षांपूर्वी झाली असून, मंदिर स्थापनेपासून दरवर्षी आषाढी एकादशीला यात्रोत्सव, येणाºया भाविकांना साबुदाण्याचा महाप्रसाद वाटप केला जातो. त्याचबरोबर प्रवचन, कीर्तन, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम होत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर एकही कार्यक्रम साजरा न करता आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. भाविकांनी एकदम गर्दी न करता, टप्या-टप्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर समितीने केले.