२० अतिगंभीर रुग्णांसाठी केवळ ६ रेमडेसिविर इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST2021-04-25T04:35:35+5:302021-04-25T04:35:35+5:30
मागणीनुसार इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने कोरोनाशी कसे लढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच दोन रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी ...

२० अतिगंभीर रुग्णांसाठी केवळ ६ रेमडेसिविर इंजेक्शन
मागणीनुसार इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने कोरोनाशी कसे लढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच दोन रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात २० गंभीर रुग्ण असूनही एकही रेमडेसिविर इंजेक्शन आले नसून इंजेक्शनचा तुटवडा मृत्यूस कारणीभूत होऊ शकतो. रुग्णाचा मृत्यूस जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेमडेसिविरचा काळाबाजार
कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपयुक्त आहे; परंतु मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने काळाबाजार होत आहे. काळाबाजारात इंजेक्शन जादा दराने विक्री केल्याप्रकरणी दोंडाईचातील एका औषध दुकानाची गुरुवारी तपासणी करण्यात आली. यावरून दोंडाईचात अनेक दिवसांपासून सुरू असलेला इंजेक्शनचा काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे; परंतु अन्न व औषध प्रशासन काहीही कारवाई कारवाई करताना दिसून येत नाही. दोंडाईचात व परिसरातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेतात; परंतु रेमडेसिविरचा तुटवडा आहे. आजही रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी वाट्टेल तेवढे पैसे देऊन काळाबाजारात इंजेक्शन घेण्यास नातेवाईक तयार आहेत, पण याचे सोयरसुतक शासकीय यंत्रणेला ना माणुसकी हरवलेल्या काही औषध विक्रेत्यांना, अशी म्हणण्याची वेळ आली आहे़
इंजेक्शनअभावी वाढला धोका
इंजेक्शनअभावी रुग्ण मरताना वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या नातेवाइकांना बघावे लागत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. भरारीपथक व अन्न-औषध विभागाने वेळोवेळी तपासणी करणे महत्त्वाचे आहे; परंतु हे दोन्ही विभाग दोंडाईचात फिरकतच नसल्याचे सांगण्यात आले. कोरोनातील गंभीर रुग्णांना रेमडेसिविर उपयुक्त असले तरी शासन व वरिष्ठ औषध विभाग पुरेसा पुरवठा करत नसल्याने काळाबाजार वाढला आहे. येथील शासकीय रुग्णालयात सोमवार, मंगळवार व बुधवारी एकही इंजेक्शन आले नसून गुरुवारी केवळ ६ इंजेक्शन आलेत. शुक्रवारी एकही इंजेक्शन आले नाही. दोडाईचा शहरात २० गंभीर रुग्ण असताना एकही इंजेक्शन न आल्याने रुग्ण रामभरोसे झाले आहेत.
(चौकटसाठी)
शुक्रवारी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात ६५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून ५२ रुग्णांना ऑक्सिजन पुरवावा लागत आहे. २० रुग्ण गंभीर आहेत, तर दोंडाईचातील विविध खासगी रुग्णालयांत २१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. समाधानाची बाब म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शुक्रवारी रुग्ण संख्या कमी झाली आहे. खासगी रुग्णालयांत सुविधा असल्या तरी रेमडेसिविर इंजेक्शन बाहेरून चढ्या किमतीत आणावे लागत असल्याने शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल केले जातात; परंतु त्यांना पण इंजेक्शन मिळत नसल्याने आता रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची पंचाईत वाढली आहे.