लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपुरसह परिसरात यावर्षीच्या खरीपातील कांदा लागवडीस सुरुवात झाली आहे. मात्र, परिसरात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे विहीरी, कुपनलिकात असेल तितक्या पाण्यात कांदा लागवड करण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. मात्र, अवेळीच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे किमान कांदा लागवडीसाठी दिवसा पुर्णवेळ वीजपुरवठा सुरू ठेऊन शेतकरी हिताचे धोरण कंपनीने राबवावे, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.मालपूरसह सुराय, कलवाडे चुडाणे, अक्कलकोस, कर्ले, परसोळे, देवकानगर आदी भागात दरवर्षी कांदा लागवड मोठया प्रमाणावर होत असते. मात्र, यावर्षी कांद्याच्या रोपाअभावी क्षेत्रफळात घट दिसून येत आहे. कांद्याची लागवड करायची असेल तर महिना-दीड महिना आधीच रोप टाकावे लागते. येथील शेतकºयांनी रोप देखील टाकले. मात्र, बहुतांश शेतकºयांची रोपे कोमेजून गेली. काहींनी दुबार रोप टाकले आहे. त्याची देखील वाढ व उगवण क्षमता योग्य दिसून येत नाही. त्यामुळे यावर्षी येथे कांदा लागवड क्षेत्र घटणार आहे. तसेच सध्याचा बाजारातील कांद्याचे भाव पहाता या नगदी पिकाकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे.१५ जूनला झालेल्या पावसानंतर येथे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यानंतर दमदार पाऊस झालाच नाही. नदी, नाले ओसंडून वाहुनच निघाले नाहीत. येथील अमरावती मध्यम प्रकल्पात अद्याप एक थेंब देखील पाणी जमा झाले नाही. मागीलवर्षीचे पाणी शिल्लक आहे. विहीरीची जलपातळी आतापासून घटत चालल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कांदा हे भरपूर पाण्याचे पिक आहे. भाद्रपद महिन्यात जोरदार पाऊस येईल, या आशेवर सध्या असेल तेवढ्या पाण्यावर येथील शेतकरी कांदा लागवड करतांना दिसून येत आहेत.काही शेतकरी विकत रोप आणून कांद्याची लागवड करीत आहे. यासाठी भांडवल जास्त खर्च होते. मात्र कांद्याच्या उत्पादनातुन येथील बºयाच शेतकºयांनी प्रगती साधली आहे म्हणून हा धाडसी निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. शेतकरी जोखीम पत्करून कांदा पिकाची लागवड करीत असतात.यावर्षी येथे कडधान्य पिके पाण्याअभावी वाया गेली आहेत. तर भुसार पिकातून पाहिजे तेवढे उत्पादन हाती लागत नाही. म्हणून कांदा हे नगदी पिक असून मागीलवर्षी कमी उत्पन्न हाती लागले तरीही हातात चलन मात्र समाधानकारक आल्याने येथील कांदा लागवडीसाठी काही शेतकºयांची ओढ मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे.मात्र भारनियमनाच्या चुकीच्या वेळेमुळे कांदा लागवड अडचणीत आली असून यासाठी दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा सुरू ठेवण्याची गरज आहे. महिन्यातून चार वेळा येथे भारनियमनात बदल होत असून दर महिन्याला वेगवेगळी वेळ असते. सध्या आॅगस्ट महिन्यात रात्री ८.३५ ते सकाळी ६.३५ वीजपुरवठा सुरू राहणार आहे.तर दिवसा सकाळी ७.५० ते ३.५० यावेळेत भारनियमन राहणार आहे. यामुळे कांदा लागवड कशी करावी, असा प्रश्न येथील शेतकºयांना पडला आहे. त्यात मजुरांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यात रात्रीच्या वेळी लागवड करणे शक्य नाही. यासाठी दिवसा अखंडीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
विजेअभावी कांदा लागवड अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:58 IST