मराठीच्या पेपरला कॅापी करताना एकास पकडले
By अतुल जोशी | Updated: March 2, 2023 17:49 IST2023-03-02T17:49:12+5:302023-03-02T17:49:12+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली.

मराठीच्या पेपरला कॅापी करताना एकास पकडले
धुळे :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. कॅापीला आळा बसावा म्हणून कॅापीमुक्त अभियान तसेच भरारी पथकांची संख्याही वाढविण्यात आलेली आहे. असे असतानाही धुळ्यात मराठीच्या पेपरला कॅापी करताना एकजण आढळून आला. हा अपवाद वगळता इतर ठिकाणी दहावीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी दिली.
जिल्ह्यात ६६ केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये १५, धुळे ग्रामीणमध्ये १६, साक्री तालुक्यात १३, शिरपूर तालुक्यात ९ व शिंदखेडा तालुक्यात १३ केंद्र आहेत.
दहावीचा पहिला पेपर असल्याने, पाल्यांना सोडण्यासाठी पालकही सोबत आल्याने परीक्षा केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली होती. सकाळी ११ वाजता पेपराला सुरूवात झाली. असे असले तरी शहरातील काही केंद्रावर कॅापी पुरविण्यासाठी तरूणांची धडपड सुरू होती. काही ठिकाणी तर कॅापी पुरविण्यात पालकांचाही सहभाग दिसून आला.
दरम्यान धुळे शहरात मराठीच्या पेपरला कॅापी करताना एकास पकडण्यात आल्याचे देसले यांनी सांगितले.