शिंदखेडा तालुक्यात ‘एक गाव, एक वाण’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:34+5:302021-06-09T04:44:34+5:30
विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ कापूस निर्मिती हा प्रमुख उद्देश ...

शिंदखेडा तालुक्यात ‘एक गाव, एक वाण’ उपक्रम
विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ कापूस निर्मिती हा प्रमुख उद्देश घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २०२१-२२ या वर्षात शिंदखेडा तालुक्यात कापूस ‘एक गाव, एक वाण’साठी ३१ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात राशी, अजित, महिको सीड्स कंपनी यांचे सहकार्य लाभत आहे.
या उपक्रमात आदर्श जयभूमी शेतकरी उत्पादक कंपनी, धुळे, लुपीन फाउंडेशन, धुळे जिल्हा कृषी पदवीधर संघ, शेतकरी व लोकप्रतिनिधींची मदत होत आहे. भविष्यात उत्पादित कापूस हा सारख्या प्रतीचा, गुणवत्ता व धागा लांबी, ताण्यता तसेच कवडी मुक्त कापूस उत्पादित करून त्याला जीनिंग, प्रेसिंगची स्थानिक पातळीवर जोड देऊन शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.
कापूस ‘एक गाव, एक वाण’साठी सर्व शेतकरी, कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, जीनिंग मिलचे प्रतिनिधी एकत्रित येऊन कार्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असा उपक्रम सर्वांना प्रेरणादायी ठरेल, असे तालुका कृषी अधिकारी बोरसे यांनी सांगितले. त्यांच्यासह कृषी अधिकारी नवनाथ साबळे, लालन राजपूत, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक विशेष परिश्रम घेत आहेत.