देवपुरातील लूट प्रकरणी एक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:47 IST2020-06-01T21:47:26+5:302020-06-01T21:47:49+5:30
चाकूचा धाक : मध्यरात्रीचा होता थरार

देवपुरातील लूट प्रकरणी एक ताब्यात
धुळे : देवपुरातील फरशी पुलावर चाकूचा धाक दाखवून लुट करणारा अवघ्या एका दिवसात पोलिसांच्या जाळ्यात अडकला़ त्यातील दुसरा संशयित फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे़ लुटीची घटना २२ मे रोजी मध्यरात्री घडली होती़ २९ मे रोजी रात्री गुन्हा दाखल झाला होता़
शहरातील चितोडरोडवरील अण्णासाहेब पाटील नगरात राहणारा अक्षय संजय क्यावल (२१) या तरुणाने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, देवपुरातील जयहिंद नर्सिंग होमजवळील फरशी पुलावरुन २२ मे रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास दोन जणांनी त्याला अडविले़ चाकूचा धाक दाखवित जबरी लूट केली़ लुटारुंनी तरुणाकडे असलेला ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि ३०० रुपये रोख व पाकिटातील काही कागदपत्रे हिसकावून घेत पोबारा केला होता़ आरडाओरड करुनही कोणीही घटनास्थळी मदतीला येऊ शकला नाही़ भेदरलेल्या स्थितीनंतर अक्षय हा घरी गेला़ याप्रकरणी २९ मे रोजी रात्री साडेदहा वाजता त्याने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ भादंवि कलम ३९२, ५०६ (२), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़
घटनेचा तपास देवपुर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी स्वत:कडे घेतला़ जबरी लूट कोण करु शकतो, याचा अंदाज घेऊन तपासाची चक्रे फिरविली आणि अवघ्या एका दिवसात संशयिताच्या मुसक्या आवळल्या़ त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे़ आता फरार संशयिताचा शोध सुरु आहे़