निजामपुरातील जुना रस्ता उकरून नवीन रस्ता तयार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:38 IST2021-08-23T04:38:40+5:302021-08-23T04:38:40+5:30
आधीचा सिमेंट रस्ता २००४ पासूनचा आहे. तो न उखडता त्यावरच थर देऊन रस्ता केला तर गावात रस्ता उंची वाढेल ...

निजामपुरातील जुना रस्ता उकरून नवीन रस्ता तयार करावा
आधीचा सिमेंट रस्ता २००४ पासूनचा आहे. तो न उखडता त्यावरच थर देऊन रस्ता केला तर गावात रस्ता उंची वाढेल व ते धोकादायक ठरेल. रस्त्यालगतची घरे, दुकाने, दवाखाने यामध्ये पाणी जाईल. नवीन रस्ता उंच व घरे, दुकाने खोल होतील. शिवाय शासन निधीतून झालेल्या लाखो रुपयांच्या विकासकामांचेही नुकसान होईल. म्हणून सध्याच्या जुन्या रस्त्याचा भराव काढून खोलीकरण करावे आणि नवीन रस्ता सध्याच्या उंचीइतकाच करावा. रस्ता होत असताना सांडपाणी गटारी, पाणीपुरवठा पाइपलाइन तुटतील, वीज खांब निघतील, यासाठी ठेकेदार कंपनीने भूमिगत वीजपुरवठा केबल ठेकेदार कंपनीने नवीन करून घ्यावा, अशी मागणी ग्रामपालिकेने दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निजामपूर गावाच्या बाजारपेठ व रहिवासी क्षेत्रातून ७ मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता व दोन्ही बाजूस युटीलिटी स्पेस असणार आहे. ठेकेदार कंपनीने मार्किंग केल्यानुसार त्यात येणारी आपापली बांधकामे ग्रामस्थांनी स्वतःहून काढणे सुरू केले आहे.
असे असताना जुन्या रस्त्यावर केवळ थर टाकून बनविण्यापेक्षा नवीन रस्ता गावाला, लोकांना आणि ग्रामपालिकेस अपेक्षित आहे, अशी विनंती या वेळी शिष्टमंडळाने केली.
निवेदनाची प्रत सार्व. बांधकाममंत्री अशोक चव्हाण, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांना देण्यात आली. वरील कामासाठी आमदार मंजुळा यांचेही सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे सरपंच प्रतिनिधी मिलिंद भार्गव यांनी लोकमतशी बोलताना नमूद केले आहे.
सरपंच प्रतिनिधी मिलिंद भार्गव, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भूपेश शाह, राजेंद्र वाणी, नितीन शाह, ग्रा.पा. सदस्य परेश पाटील, सुरेंद्र विसपुते, प्रवीण वाणी, गजानन शाह, दिलीप पवार, महेश राणे, मनोहर राणे, शिष्टमंडळात उपस्थित होते.