चार साठवण बंधाऱ्याची अधिकाऱ्यांनी केली पाहणी चौकशी पथकाने केली पहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST2021-02-08T04:31:28+5:302021-02-08T04:31:28+5:30
धुळे तालुक्यातील कापडणे गावात व शेती शिवारात विविध चार साठवण बंधाऱ्यांचे काम जलयुक्त शिवारातून २०१७-१८ मध्ये मंजूर झाले ...

चार साठवण बंधाऱ्याची अधिकाऱ्यांनी केली पाहणी चौकशी पथकाने केली पहाणी
धुळे तालुक्यातील कापडणे गावात व शेती शिवारात विविध चार साठवण बंधाऱ्यांचे काम जलयुक्त शिवारातून २०१७-१८ मध्ये मंजूर झाले होते. यात भात नदीवर एक, भारा नाला, दुधाईनाला, व धमाणेरोड लगत पांजर तलावावर प्रत्येकी एक-एक साठवण बंधारा मंजूर झालेला होता. मात्र पैकी कोणत्याही बंधाऱ्याचे काम न करताच खासगी ठेकेदार व सदर विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून ठेकेदाराला लाखो रुपयांची बिले अदा, केल्याची तक्रार केली होती. यामुळे कापडणे येथील शेतकरी प्रफुल रंगराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने ५ फेब्रुवारी रोजी धुळे जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे चौकशी पथक गावात दाखल झाले. या पथकात जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग उपविभागीय अधिकारी हितेश भटूरकर, शाखा अभियंता के.डी. देवरे यांचा समावेश होता. पथकाने कापडणे येथे येऊन चारही साठवण बंधाऱ्यांची पाहणी करून येथील शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. यात प्रशांत गोकूळ पाटील, धर्मा महारू पाटील, मनोज मुरलीधर पाटील, ज्ञानदीप पुंडलिक पाटील, नवल नामदेव पाटील, आदी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे जबाब नोंदवला आहे.
कापडणे येथे २०१७-१८ मध्ये चार साठवण बंधारे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर झाले होते. पैकी भात नदीवरील बंधाऱ्याचे जेसीबीमार्फत अर्धवट काम झाले आहे. उर्वरित तीन बंधाऱ्याचे काम झाले नाही, असे जबाब येथील शेतकऱ्यांनी दिले आहे. या कामाची पाहणी केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- के.डी. देवरे, अभियंता,
लघुसिंचन विभाग,जि.प.धुळे