छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात भरगच्च कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 17:07 IST2018-02-10T16:34:54+5:302018-02-10T17:07:09+5:30
शहरातील मंडळे सज्ज : मिरवणुका वेधणार लक्ष; विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात भरगच्च कार्यक्रम
(लोकमत न्यूज नेटवर्क)
धुळे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील विविध मंडळांतर्फे मिरवणुका व भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीच्यानिमित्ताने शहरातील बाजारपेठेत भगवे ध्वज, गळ्यातील मोत्यांचा माळा, टी-शर्ट आदी साहित्य विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवले आहेत. ते खरेदीसाठी शनिवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी दिसून आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी, १९ रोजी आहे. यानिमित्ताने मराठा सेवा संघ, सकल मराठा समाज, शहरातील विविध व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यात प्रतिमापूजन, स्वच्छता अभियान व व्याख्यानाचा कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच मिरवणुकांद्वारे जनजागृतीपर संदेश दिला जाणार आहे. शहरातील प्रमुख मंडळांतर्फे जुना आग्रारोडवरून सोमवारी सायंकाळी मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे.
चाळीसगावरोडवर पुतळ्याचे सुशोभिकरण
गेल्या आठवड्यात चाळीसगावरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याचे काम सुरू झाले होते. हे काम आता पूर्णत्त्वास आले आहे. तसेच शहरातील शिवतीर्थ परिसरातही स्वच्छता करण्यात आली आहे. याठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे शिवतीर्थ परिसर खुलून दिसत आहे.
धुळे शहर भगवामय
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील जुना आग्रारोड व देवपूर परिसरातील मुख्य चौकांमध्ये लहान व मोठ्या आकाराचे भगवे ध्वज, तसेच फलक लावण्यात आले आहेत. अवघ्या एका आठवड्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आल्याने विक्रेत्यांनी फुलवाला चौक, दसेरा मैदान, मालेगावरोड, दत्त मंदिर परिसर, नेहरू चौक व नगावबारी परिसरात भगवे ध्वज विक्रीसाठी विक्रेत्यांनी ठेवले आहे. या भगव्या ध्वजाची किंमत १०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती विक्रेते नीलेश यादव यांनी दिली.