पोषण आहारांतर्गत ग्रामीण भागात कडधान्य तर शहरात फक्त मिळतो तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:31+5:302021-02-05T08:46:31+5:30
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण ...

पोषण आहारांतर्गत ग्रामीण भागात कडधान्य तर शहरात फक्त मिळतो तांदूळ
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. दरम्यान मार्च २०२०पासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने, सर्वच शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांना घरपोच शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कडधान्य,डाळ व तांदळाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान ग्रामीण भागात कडधान्य व डाळ तर शहरी भागात फक्त तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. धुळे तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंत पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९७ हजार ८०० एवढी आहे.
घरपोच आहार
शाळेतील विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी शालेय पोषण आहार योजेनेंतर्गत शाळेतच आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जात होता. मात्र मार्च २०२०पासून देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने, राज्य शासनाने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान कोरोनाबाबत नियमांचे पालन करून गेल्यावर्षी एप्रिल-मे पासूनच विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहाराचे वितरण करण्यात येऊ लागले. आता शाळा जरी सुरू झालेल्या असल्या तरी अद्याप शाळांमध्ये आहार देण्याऐवजी विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहाराचे साहित्य देण्यात येत असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.