एसटीने प्रवास करणाऱ्या आमदारांची संख्या कमी, स्वत:च्या वाहनांचाच वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:53+5:302021-08-13T04:40:53+5:30
धुळे : तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना एसटीने मोफत प्रवासासोबतच एक आसनही राखीव ठेवलेले आहे. मात्र वेळेचे कारण देऊन अनेक ...

एसटीने प्रवास करणाऱ्या आमदारांची संख्या कमी, स्वत:च्या वाहनांचाच वापर
धुळे : तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना एसटीने मोफत प्रवासासोबतच एक आसनही राखीव ठेवलेले आहे. मात्र वेळेचे कारण देऊन अनेक आमदार स्वत:च्या महागड्या वाहनांनेच प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्याने, आमदारांचा एसटीने प्रवास करणे दुर्मिळ झालेले आहे.
पूर्वी प्रवासाची साधने मर्यादित होती. त्यामुळे काही वर्षांपूर्वी आमदार एसटीनेच ग्रामीण भागात प्रवास करायचे. प्रवासादरम्यान प्रवाशांशी गप्पा व्हायच्या, त्यांच्या समस्याही लक्षात यायच्या. मात्र आता काळ बदलला आहे. सर्वच आमदारांकडे स्वत:ची आलिशान वाहने आहेत. त्यामुळे मतदार संघात असो अथवा मुंबई, नाशिकला जायाचे असो, आमदार आपल्या वाहनांनीच प्रवास करणे पसंत करतात. स्वत:च्या वाहनाने वेळेत जाता-येता येते. एसटीचे तसे नाही. एसटीला वेळ लागत असल्याने आता लोकप्रतिनिधीही एसटीने प्रवास करणे टाळतात. आमदार जयकुमार रावल, माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी एसटीने प्रवास केला आहे.
आमदार झाल्यानंतर काही दिवसातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यानंतर एसटीही बंद होती. त्यामुळे प्रवास करता आला नाही. एसटी प्रवासाच्या माध्यमातून प्रवाशांच्या समस्या समजतात. आगामी काळात एसटी प्रवास करू.
- मंजुळा गावीत,
आमदार साक्री
तालुक्यात मानव विकास मिशन अंतर्गत बसेस सुरू केल्या तेव्हा एसटीने प्रवास केला. तसेच हिवाळी अधिवेशनादरम्यान एकदा आमदार निवास ते विधानभवनापर्यंत एसटीची व्यवस्था केलेली होती. त्यावेळी प्रवास केला आहे. - जयकुमार रावल
आमदार शिंदखेडा
डी.एस. अहिरे, प्रा. पाटील यांनी केला प्रवास
साक्री तालुक्याचे तत्कालीन आमदार डी.एस. अहिरे यांनी सांगितले की, मी २०१५ मध्ये आमदार असतांना पुणे ते धुळे असा बसने प्रवास केला होता. त्यावेळी वाहकाने माझे स्वागत केले होते. त्यानंतर धुळे ते कुडाशीही अनेकदा एसटीने प्रवास केलेला आहे.
धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील म्हणाले, छत्रपती पुरस्कार मिळाल्याने, मला एसटीने मोफत प्रवास करण्याची सुविधा होती. मात्र मी तिकीट काढूनच प्रवास केला. आमदार असतानाही नेर, कुसुंब्याला अनेकदा एसटीने प्रवास केला आहे. एसटीने प्रवास करतांना प्रवाशांशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा होत असतात. त्यातून त्यांच्या समस्या समजण्यास मदत होत असते. जनसंपर्कवाढीचे एसटी हे चांगले माध्यम आहे.
चारचाकीत फिरणाऱ्यांना कशाला हवी सवलत
बहुतांश लोकप्रतिनिधींकडे अलिशान गाड्या आलेल्या आहेत. ते एसटीने प्रवास करताना कधी दिसतच नाही. चारचाकी वाहनात फिरणाऱ्यांना मोफत प्रवासाची सवलत नको. - एस.बी.पाटील
सर्वसामान्य प्रवासी