गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रमाण ३० टक्के घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 13:45 IST2020-07-24T13:45:16+5:302020-07-24T13:45:39+5:30
कापडणे : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बुकींगचे प्रमाण झाले कमी

गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रमाण ३० टक्के घटले
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे :गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. मात्र राज्यात कोरानाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने, त्याचे सावट वर्षातील या मोठ्या उत्सवावरही पडले आहे. कोरोनामुळे यावर्षी गणेशमूर्ती तयार करण्याचे काम ३० टक्यांनी कमी झाले असल्याने, त्याची झळ मूर्तीकारांनाही बसली आहे.
गेले तीन महिने लॉकडाऊन असल्याने, मूर्तीकारांना मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळविण्यासाठी खूपच कसरत करावी लागली. जास्त पैसे मोजून कच्चे साहित्य घ्यावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार नसल्याने, मूर्ती तयार कण्याचे प्रमाण ३० टक्यांनी घटले आहे. मूर्ती तयार आहेत, मात्र बुकींगला पुरेशाप्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. तयार होऊनही अद्याप मूर्ती बुकिंगला पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही .गणेशोत्सव जवळ येत असल्याने कापडणे येथील पंढरीनाथ संपत कुंभार, कैलास कुंभार, स्वाती कुंभार गणेश कुंभार, विद्याबाई कुंभार ,हर्षल कुंभार, कुणाल कुंभार ,संगीता कुंभार, जोशना चौधरी, अनिता कुंभार, आदी मूर्तिकार गणेश मुर्ती साकारण्यात रंगकाम करण्यात व्यस्त आहेत.
कापडणे येथे तयार होणाऱ्या मूर्तींना धुळे जिल्ह्यासह, नंदुरबार, शहादा, नाशिक पुणे-मुंबई ,मालेगाव, एरंडोल, जालना जळगाव आदी ठिकाणाहून मागणी असायची. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत होती. मात्र यावर्षी मूर्तींना अपेक्षेप्रमाणे मागणी नसल्याचे सांगण्यात येत आहे.