शंभर, दहा, पाचच्या नोटा बँकामध्ये जमा करणाऱ्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 14:53 IST2021-01-27T14:53:45+5:302021-01-27T14:53:54+5:30
शिरपूर : ५०० व १००० रूपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद होणार अशी घोषणा दोन वर्षापूर्वी झाल्यानंतर सर्वसामान्यांची अक्षरश: झोप ...

शंभर, दहा, पाचच्या नोटा बँकामध्ये जमा करणाऱ्यांचे प्रमाण वाढले
शिरपूर : ५०० व १००० रूपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद होणार अशी घोषणा दोन वर्षापूर्वी झाल्यानंतर सर्वसामान्यांची अक्षरश: झोप उडाली होती़ आता तसाच प्रसंगी पुन्हा एकदा ओढवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ कारण रिझर्व्ह बँकेने १००, १० व ५ रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचे संकेत दिले आहेत़
शहरात गेल्या २ दिवसांपासून यासंबंधी चर्चांना उधाण आले होते़ त्यामुळे आपल्याकडील १००, १० व ५ रूपयांच्या नोटा जुन्या नोटा बँकेत जावून बदलून घेण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू झाली़ रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाबाबत सत्यता जाणण्यासाठी अनेकांनी बँक कर्मचाऱ्यांशी तसेच प्रसिध्दी माध्यमांशी संपर्क साधला़. मात्र रिझर्व्ह बँकेच्या लेखी सूचना अद्याप आपल्यापर्यंत पोहोचल्या नसल्याचे बँक यंत्रणेने स्पष्ट केले़ त्यामुळे नागरिकांचा संभ्रम अधिकच वाढला़. तूर्त या तीनही नोटा चलनात आहेत, शिवाय त्या लगेच बंद होण्याचे चित्र नाही़ त्यामुळे नागरिकांनी कसाबसा धीर धरला आहे़ दरम्यान सोमवारी काही नागरिकांनी शंभर, दहा व पाचच्या नोटा जमा करण्यासाठी बँकेत धाव घेतली होती.