ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा दोनशे पार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 11:41 IST2020-12-24T11:41:14+5:302020-12-24T11:41:29+5:30
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या म्हणजेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० ...

dhule
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या म्हणजेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० पार गेली आहे. मागील दोन महिन्यांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली होती मात्र आता पुन्हा त्यात वाढ झाली आहे. धुळे शहरात जास्त रुग्ण आहेत तर साक्री तालुक्यात उपचार घेत असलेले सर्वात कमी कोरोनाचे रुग्ण आहेत.
जिल्ह्यात मंगळवार अखेर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २३१ इतकी झाली आहे. ३० नोव्हेंबर रोजी रुग्णांची संख्या १८४ इतकी होती. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा विस्फोट झाला होता. त्यावेळी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५०० पेक्षा अधिक झाली होती. मात्र त्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० पेक्षा कमी झाली होती. आता त्यात पुन्हा वाढ झाली आहे.
६१ टक्के रुग्ण धुळे शहरात-
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६१ टक्के रुग्ण धुळे शहरातील आहेत. धुळे शहरात सुरुवातीपासूनच उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या जास्त राहिली आहे. जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या २०४ रूग्णांपैकी १४१ सक्रिय रुग्ण हे धुळे शहरातील आहेत. सर्व तालुक्यातील रुग्णांची संख्या मात्र ५० पेक्षा कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. साक्री तालुक्यात सर्वात कमी रुग्ण आहेत. धुळे तालुक्यात २७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शिरपूर तालुक्यातील १५, शिंदखेडा ३४ व साक्री तालुक्यातील १४ जण उपचार घेत आहेत. शिरपूर तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली होती. तेथील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ २ इतकी झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे तालुक्यात सध्या १५ रुग्ण आहेत.
बुधवारी १४ अहवाल पॉझिटिव्ह
जिल्ह्यातील आणखी १४ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. तसेच एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. धुळे शहरातील कबीरगंज परिसरातील ३५ वर्षीय महिलेचा हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ४४ अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, तुळशीराम नगर १, सम्राट नगर १, साई समर्थ कॉलनी १, रावेर १, सातपुडा विद्यालय २, गल्ली क्रमांक सात, देवपूर १, खोलगल्ली १ व राम नगर मार्केट यार्ड येथील एकाचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व १० अहवाल निगेटिव्ह आले. तसेच रॅपिड अँटिजन टेस्टचे सर्व १४ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व १५ अहवाल निगेटिव्ह आले. भाडणे कोविड केंद्रातील ७० अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले . त्यात, कर्मवीर नगर साक्री १ व केवीडी शाळा धनेर येथील एकाचा समावेश आहे. महानगरपालिका कोविड केंद्रातील रॅपिड अँटीजन टेस्ट मधील सर्व १५३ अहवाल निगेटिव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९ अहवालांपैकी धुळे शहरातील १ अहवाल पॉझिटिव्ह आला. खाजगी प्रयोगशाळेतील १३ अहवालापैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, विद्यावर्धिनी कॉलनी व औदुंबर सोसायटी येथील एकाचा समावेश आहे.