आता सारी, डेंग्यू आजारानेही डोके वर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 11:31 IST2020-12-05T11:30:43+5:302020-12-05T11:31:07+5:30
भूषण चिंचोरे- जिल्हयात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला नसताना जिल्ह्यात सारी व डेंग्यू आजाराने डोके ...

dhule
भूषण चिंचोरे-
जिल्हयात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला नसताना जिल्ह्यात सारी व डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे २१ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात सर्वात जास्त रुग्ण आढळले असून प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोधमोहिमेला देखील सुरुवात झाली आहे. १६ डिसेंबर पर्यंत हि मोहीम चालणार आहे. अशा विविध पातळीवर आरोग्य यंत्रणेची कसरत सुरु झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना सोबतच सारीचेही रुग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सारी हा आजार श्वसनसंस्थेशी संबंधित आहे. कोरोना व सारी दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत.
भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड विभागात सारीच्या रुग्णांवर देखील उपचार सुरु आहेत. कोविड विभागात एकूण ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
त्यात, १३ कोरोनाबाधित व २७ सारीचे रुग्ण आहेत. तर ७ संशयित रुग्ण असून त्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. सारी आजाराची लक्षणे कोरोनासारखीच असल्यामुळे सारीच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात येते.
कोरोना व सारी दोन्हीही आजारांमध्ये शास घ्यायला त्रास होत असतो. त्यामुळे कोरोना सारखीच लक्षणे असलेल्या रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येतो. व त्या रुग्णाच्या चिंतेत आणखी भर पडते. असा रुग्ण सारी या आजाराचा असू शकतो.त्यामुळे लक्षणे दिसत असतील तर लवकर कोरोनाची चाचणी करून घ्यावी.
दरम्यान, डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत केवळ ३ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात २१ रुग्णांची भर पडली आहे. यावर्षी आतापर्यंत, २०० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. जून महिन्याचा अपवाद वगळता सप्टेंबर महिन्यापर्यंत डेंग्यूचे रुग्ण आढळले नव्हते. मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. जून महिन्यात तीन रुग्ण आढळले होते तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात एकूण २१ रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे एकूण २४ रुग्णांची यंदा नोंद झाली आहे.सुदैवाने एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी आढळलेल्या २४ रुग्णांपैकी १६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.तर शहरी भागात ८ रुग्ण आढळले आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आढळलेल्या २१ रुग्णांपैकी १३ रुग्ण ग्रामीण भागातील तर ८ रुग्ण शहरातील आहेत. ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे.