आता अवाजवी दर आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयावर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:06 IST2020-08-09T12:03:54+5:302020-08-09T12:06:05+5:30
भरारी पथकाची नियुक्ती । जिल्हा प्रशासन व महापालिकेचे स्वतंत्र पथक नियुक्त

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणाºया खाजगी रुग्णालये व रुग्णवाहिकांवर आता भरारी पथकांची करडी नजर असणार आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत असलेले खाजगी रुग्णलये व रुग्णवाहिका अवाजवी रक्कम वसूल करीत आहेत. त्यासंदर्भात रुग्णांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत राज्य शासनाने भरारी पथके नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात दोन पथके नेमण्यात आली आहेत.
खाजगी रुग्णालये कोरोनाच्या काळातही बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करत असल्याच्या अनेक घटना राज्यभर उघडकीस आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये व रुग्णवाहिकेचे दरपत्रक शासनाने याआधीच निश्चित केले आहे.
मात्र कोरोनाबाधित रुग्णांची लूट होत असल्याचे चित्र राज्यभर निर्माण झाले आहे. जारी केलेल्या दरपत्रकाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ७ आॅगस्ट रोजी भरारी पथक नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या भरारी पथकात जिल्ह्यातील प्रांताधिकाºयांचा समावेश करण्यात आला आहे. तर मनपा आयुक्तांनी मुख्य लेखापाल एन.एम.भामरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची भरारी पथकात नेमणूक केली आहे.
भरारी पथक हे अचानकपणे खाजगी रुग्णालयात भेट देऊन तपासणी करणार आहेत.