आता लक्ष लागले निकालाकडे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:09+5:302021-01-17T04:31:09+5:30
जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. सरासरी ७७ टक्के मतदान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

आता लक्ष लागले निकालाकडे...
जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. सरासरी ७७ टक्के मतदान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेले मतदान हे निवडणुकीतील चुरस किती आहे, याचे प्रमाण आहे. आता लक्ष निकालाकडे लागले. गावाचा कारभारी कोण बनणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत निकाल काय लागेल याची उत्कंठा गावकरी आणि नेतेमंडळींना लागली आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवर लढविली जाते. परंतु त्याच्या निकालांचा परिणाम जिल्ह्यात या वर्षात होणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिकेसह सर्व निवडणुकीवर पडणार, हे निश्चित आहे. चारही तालुक्यात ही निवडणूक स्थानिक स्तरावर लढली गेली. काही ठिकाणी स्थानिक स्तरावरच महाविकास आघाडी स्थापन झाली. जिल्हास्तरावर मात्र महाविकास आघाडी झालेली नव्हती. जिल्ह्यात जवळपास सर्वच ग्रामपंचायतीत भाजपचे उमेदवार स्थानिक पॅनलमधून निवडणूक लढले. शिरपूर तालुक्यात तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप अशी परिस्थिती होती.धुळे तालुका - तालुक्यात काही ग्रामपंचायतीत प्रचंड चुरस होती. तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतीत कॉंग्रेसचे माजी आमदार रोहिदास पाटील व त्यांचे चिरंजीव आमदार कुणाल पाटील यांच्या गटाविरोधात भाजपतर्फे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार द.वा.पाटील गटातर्फे त्यांचे चिरंजीव मनोहर भदाणे, माजी पं.स.सभापती ज्ञानज्योती भदाणे आणि त्यांचे चिरंजीव भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांच्या गटातच सरळ लढत होते आहे. त्यात शिरुड, कापडणे, सोनगीर या प्रमुख ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या दोन्ही गटासोबतच काही ठिकाणी स्थानिक नेत्यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. त्यात नेरला भाजपचे शंकरराव खलाणे, शिरुडचे गजानन पाटील यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तालुक्यात वरील दोन गटासोबतच खासदार डॉ.सुभाष भामरे, माजी जि.प.अध्यक्ष सुभाष देवरे, जि.प.सभापती रामकृष्ण खलाणे यांचीही राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिंदखेडा तालुका - धुळे तालुक्यानंतर शिंदखेडा तालुक्यात काही चुरशीच्या लढती होत आहेत. त्याठिकाणी स्थानिक नेत्यासह जिल्हा नेत्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांची सुलवाडे तर आमदार जयकुमार रावल यांचे निकटवर्तीय जि.प. चे गटनेते कामकाज निकम यांची बाह्मणे, आमदारांचे स्वीय सहायक दिनेश ठाकरे यांची कर्ले, बाजार समितीचे संचालक पाणीदार गावाचे माजी सरपंच शरद पाटील यांची सार्वे आणि सनेर समर्थक रावसाहेब पाटील यांची बेटावद या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण या ठिकाणी वरील नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधी गटातील नेत्यांकडून जोरदारपणे करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीचे निकाल तालुक्यातील पुढील राजकीय गणित कसे असेल हे ठरविणार आहे. या निवडणुकीत पहिल्यांदा आमदार रावल यांचे कट्टर विरोधक डॉ. हेमंत देशमुख यांचा गट जास्त सक्रिय दिसत नाही. दुसरीकडे शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके हे ग्रामपंचायतीत सक्रिय दिसत आहेत. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे हे सक्रिय आहेत. या सर्व नेत्यांचा प्रभाव किती पडला हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
साक्री तालुका - तालुक्यात स्थानिक स्तरावर निवडणूक लढविली जात आहे. तालुक्यातील मालपूर,निजामपूर, जैताणे, दुसाणे या ग्रामपंचायतीतील निवडणूक चुरशीची होत आहे. सर्वात जास्त चुरस मालपूर ग्रामपंचायतीत आहे. मालपूर हे खासदार डॉ.सुभाष भामरे यांचे गाव आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मालपूरमध्ये खासदारांचे बंधू भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला होता. यंदा त्यांनी पुन्हा पॅनल उभे केले आहे. त्यांच्याविरोधात सत्ताधारी शशीकांत भामरे यांचे पॅनल उभे आहे. गेल्या जि.प., पं.स. निवडणुकीत तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गावांनी काँग्रेसला तारले होते. त्याच भागातील ग्रामपंचायतीत यंदा निवडणुका होत आहेत. त्यापैकी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी आपली मालणगाव ग्रामपंचायत बिनविरोध आणत कॉंग्रेसचे अकौंट उघडले आहे. आता माजी आमदार डी.एस.अहिरे, माजी खासदार बापू चौरे आणि जि.प.सदस्य पोपटराव सोनवणे यांच्या प्रयत्नाचा फायदा किती होतो, हे निकालानंतरच कळेल.
शिरपूर तालुका - तालुक्यात भाजपचे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी आदिवासी पट्ट्यातील काही ग्रामपंचायत बिनविरोध आणत भाजपला आदिवासी पट्ट्यात एंट्री करवून दिली. बिनविरोध आलेल्या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रवादीने ही आपला दावा केला आहे. तालुक्यात काॅंग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही. तर राष्ट्रवादीतर्फे डाॅ.जितेंद्र ठाकूर हे लढा देत आहेत. ते किती प्रभावी ठरतात हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.