आता आषाढातही शुभमंगल सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:27+5:302021-07-19T04:23:27+5:30
शिरपूर : आषाढात साधारणत: शुभ कार्ये टाळली जातात. मात्र, कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत. अनेक दिवसांपासून कोरोनाच्या ...

आता आषाढातही शुभमंगल सावधान !
शिरपूर : आषाढात साधारणत: शुभ कार्ये टाळली जातात. मात्र, कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत. अनेक दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नासाठी असलेले निर्बंध बघता काहींनी लग्न समोर ढकलले होते. परंतु, आता निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्याने मिळेल त्या मुहूर्तावर लग्न उरकून घेण्यावर भर दिला जात आहे.
कोरोनामुळे मागील वर्षापासून अनेकांनी आपले लग्न पुढे ढकलल्याचे दिसून येत होते. लग्न धूमधडाक्यात करण्यासाठी निर्बंध शिथिल होण्याची वाट पाहणारे आता आषाढमध्येही लग्न करण्यास समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने विवाह उरकण्याकडे वधू-वर पित्यांचा कल वाढला आहे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला जातो. हिंदू धर्मात विवाह हे एक असे कार्य आहे, जे केवळ दोन लोकांमध्येच घडत नाही, तर दोन कुटुंबांना जोडते, म्हणूनच लग्नाशी संबंधित सर्व शुभ कार्ये शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस पाहून करतात. जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये म्हणून ग्रहांच्या स्थितीपासून या सर्वांचे मूल्यांकन केले जाते.
सध्या लग्नाचे मुहूर्त असल्याने दररोज लग्नसमारंभ उरकण्यात येतात. ना तिथी, ना कोरोनाची भीती अशा परिस्थितीत लग्नसमारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. तालुक्यातील गावांपैकी असे एकही गाव शिल्लक नाही, ज्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. धूमधडाक्यात लग्नसमारंभ पार पाडण्यात आले. डीजे, बँडच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी, गत जानेवारी ते मे महिन्यापर्यंत कोरोनाने उग्र रूप धारण केले होते. मात्र, गत महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या घटल्यामुळे सध्या शिरपूर तालुका कोरोनामुक्त झाला आहे. पूर्वी आषाढात लग्न करणे शुभ समजले जात नव्हते. मात्र, आता आषाढातही लग्न लावले जात आहे. या महिन्यातही शुभ तारखा आहेत. शुभ मुहूर्त म्हणजे ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूल स्थिती. विवाहामध्ये शुभ मुहूर्तावर विशेष काळजी घेतली जाते.
- जयेश जोशी,
पंडित
कोरोनामुळे यावर्षी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पडले आहेत. आता आषाढातही शुभ मुहूर्त असल्याने, अनेकांनी विवाह समारंभाचे आयोजन केले आहे. आषाढात केलेले विवाहदेखील शुभ असतात. त्यामुळे या महिन्यात प्राधान्य दिले जाते.
योगेश दीक्षित
पंडित
राज्य शासनाने कोविड-१९ च्या अनुषंगाने डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे काही निर्बंध लागू करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार लग्न समारंभात बँड पथक, कॅटरिंग, आदींसह पूर्व परवानगीने कोविड नियमांचे पालन करून ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मात्र, त्या नियमांचे पालन पाहिजे तसे शिरपुरात होत नाही.
मंगल कार्यालये बुक
n आषाढातील मुहूर्तावरही लग्न समारंभासाठी मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत.
n कोरोनामुळे मंगल कार्यालय चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मंगल कार्यालयांना विवाह समारंभासाठी तारखा मिळत नसल्याचे चित्र आहे.