अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती नाही, घसरणीची अवस्था सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 13:02 IST2020-03-02T13:01:29+5:302020-03-02T13:02:21+5:30
शिरपूर : आर.सी. पटेल महाविद्यालयात उमविचे डॉ.जितेंद्र तलवारे

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती नसून घसरणीची अवस्था मात्र सुरु आहे. कृषिप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे जगातील इतर विकसित देशांसारखी मंदीची झळ भारतात नाही, तथापि लोकांनी अनावश्यक वस्तूंच्या उपभोगावर खर्च न करता कर्जरोखे, शेअर्स, म्युच्युअल फंड यात पैसा गुंतविल्यास उद्योगधंदे उभे राहतील़ लोकांना रोजगार मिळून त्यांच्या उत्पनात वाढ होईल व जॉबलेस ग्रोथ म्हणजे रोजगाराविना अर्थव्यवस्थेतील वृद्धी ही समस्या दूर होईल, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जितेंद्र तलवारे यांनी केले.
आर.सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सद्यस्थितीतील भारतातील आर्थिक मंदी’ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयातील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग विभाग प्रमुख व विद्यापीठाचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जितेंद्र तलवारे, डॉ़ए़जी़ सोनवणे, प्रा.ए.एस़ जैन, प्रा.पी.डी. श्रावगी, प्रा.एस.पी. पिंजारी आदी उपस्थित होते़
उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.जी. सोनवणे म्हणाले की, सध्या भारतात मंदीसदृश्य परिस्थिती असून वाहन उद्योग, घरबांधणी उद्योग, कापड उद्योग व ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उद्योगात मागणी घटल्याचे दिसत असून देशाचा जीडीपी घटला आहे़ याला जागतिक बाजारपेठेतील घडामोडींसोबत नोटबंदी, जीएसटी, बँकांचा वाढता तोटा, वाढते यांत्रिकीकरण यासारख्या बाबी जबाबदार आहेत.
प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील म्हणाले, मंदीची परिस्थिती चिरकाळ टिकून राहत नाही़ मात्र, देशापुढे आर्थिक संकट उभे राहिल्यावर फक्त सरकारकडून अपेक्षा करणे व्यर्थ ठरते. जनतेनेही स्वत:हून काही गोष्टींचे पालन केले पाहिजे.
याप्रसंगी अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील द्वितीय व तृतीय वर्ष या वर्गातील ८५ विद्यार्थी सहभागी होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.एस.जी. पिंगळे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय विभाग प्रमुख डॉ.ए.ए. पाटील यांनी करुन दिला. आभार प्रा.यु.जी.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश सोनार, बी.टी. चौधरी, डी.यु. पटेल, मेहुल गुजराथी, हंसराज कढरे, लक्ष्मीकांत मोरे आदींनी सहकार्य केले.