जिल्हाधिकारी कार्यालयातही ‘नो एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:50 IST2020-03-19T12:50:00+5:302020-03-19T12:50:22+5:30
कोरोना रोखण्यासाठी उपाय : गर्दी टाळण्यासाठी एकालाच प्रवेश, उपाययोजनेसाठी एक कोटीपैकी ४० लाखांचा निधी प्राप्त

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदे पाठोपाठ आता जिल्हाधिकारी कार्यालयातही गर्दीला ‘नो एन्ट्री’ आहे़
जिल्हाधिकारी कार्यालय आवाराचे मुख्य प्रवेशद्वार खुले आहे़ परंतु प्रशासकीय इमारतीच्या दोन्ही बाजुचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत़ शिवाय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करुन केवळ एक व्यक्ती प्रवेश करु शकेल इतके खुले ठेवले आहे़ विशेष म्हणजे या प्रवेद्वारातून गर्दी आता येवू नये यासाठी प्रवेशद्वारावर काठीधारी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे़
जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश बंदी केली आहे किंवा कसे याबाबत प्रशासनाने कोणतेही लेखी आदेश जारी केलेले नाहीत़ परंतु खबरदारीचा उपा म्हणून गर्दी टाळण्यासाठी प्रवेशद्वार बंद केल्याचे सांगण्यात आले़
नेहमीसारखी वर्दळ नाहीच
दरम्यान, कोरोनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एक प्रकारे सुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे़ आंदोलने, मोर्चे आणि निवेदन देण्यासाठी जिल्हाभरातील नागरीकांची होणारी गर्दी आता नाही़ विशेष म्हणजे बुधवारी निवेदन देण्यासाठी कुणीही आले नसल्याचे सांगण्यात आले़ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ देखील फारशी दिसली नाही़
बैठकांचे प्रमाण वाढले
जिल्हाधिकारी गंगाथरण डी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या मंत्रालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी कर्मचाºयांशी सातत्याने बैठक सुरू आहेत़ मंत्रालयातील अधिकारी कोरोनाबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहेत़ तासातासाचे अपडेट मागविले जात आहेत़ उपाययोजनांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे़ मंत्रालयाला माहिती पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी देखील सातत्याने तालुका तसेच गाव पातळीवरील यंत्रणेशी सतत संपर्क ठेवून आहेत़
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे धुळे नंदुरबार विधानपरिषदेची निवडणूक देखील पुढे ढकलली जाण्याची शक्यता आणि चर्चा होती़ परंतु बुधवारी सायंकाळपर्यंत से कोणतेही आदेश प्राप्त झाले नव्हते़
साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी केंद्र बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुधवारी दिले़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १३ मार्चपासून लागू झाला आहे़ या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाºयांना सक्षम प्राधिकारी नेमले आहे़ या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील बायोमेट्रीक पध्दतीचा वापर असलेले सर्व आधार केंद्र ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत़
जिल्हा रुग्णालय सज्ज
दरम्यान, शहरातील जिल्हा रुग्णालयात सुरु केलेल्या तीस खाटांच्या विलगीकरण कक्षात आवश्यक ते साहित्य आणि पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा आहे़ आॅक्सिजन आहे़ निधी प्राप्त झाला तर व्हेंटीलेटर खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एम़ पी़ सांगळे यांनी दिली़ संशयावरुन तपासणीसाठी येणाºया रुग्णांना माणुसकीची वागणूक देवून समुपदेशन केले जाईत असे ते म्हणाले़