धुळे : शाळेत जाण्यासाठी मुले ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना चॉकलेट, नवीन शैक्षणिक साहित्य अशी विविध प्रलोभने दाखवली जातात; मात्र आता मुलांची मागणी बदलल्याचे दिसून येत आहे. शाळेत जाण्यापूर्वी मुले चॉकलेट नको, मला नवीन मास्क, सॅनिटायझरची बाटली हवी, असा हट्ट धरू लागली आहेत. मुलांच्या या हट्टामुळे गेल्या आठवडाभरात मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले आहेत. आतापर्यंत ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेली मुले आता शाळेत जायला लागली आहेत. शाळा सुरू होऊन अवघे दहा दिवस झाले असून, या दहा दिवसात मेडिकलमधील मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. शाळा सुरू असताना मुले दररोज नवीन पेन, पेन्सील, वही, कंपास यासारख्या शैक्षणिक साहित्यासह चॉकलेट, बिस्कीटची मागणी पालकांकडे करतात. मुलांकडून होणाऱ्या विविध वस्तूंच्या या हट्टामध्ये आता काहीसा बदल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुले शाळेत जाण्यापूर्वी पालकांकडे आता नवीन मास्क, सॅनिटायझरची बाटली मागत आहेत. मित्राने जसे रंगीत, डिझाईनचे मास्क आणले, मलाही तसेच मास्क हवेत, यासाठी मुले हट्ट धरत असल्याचे काही पालकांनी सांगितले. मुलांच्या या हट्टामुळे मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ झाल्याची माहिती मेडिकल व्यावसायिकांनी दिली.
स्प्रेवाल्या सॅनिटायझरची मागणी
मुलांकडून सध्या शाळेत नेण्यासाठी स्प्रेवाल्या सॅनिटायझरची मागणी होत आहे. सध्या मेडिकलमध्ये अगदी २५ रुपयांपासून सॅनिटायझरच्या बाटल्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये जेलीवाले सॅनिटायझर, स्प्रेवाले सॅनिटायझर आहेत; परंतु मुलांना स्प्रेवाले सॅनिटायझरच हवे आहेत.
डिझाईनच्या मास्कची क्रेझ
शाळेत आपला मास्क सर्वात चांगला दिसावा, यासाठी मुलींमध्ये डिझाईनच्या मास्कची क्रेझ वाढली आहे. बाजारात वेगवेगळ्या रंगाचे व डिझाईन्सचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत; परंतु त्यामध्ये मुली डिझाईनच्या मास्कला पसंती देत आहेत.
शाळा सुरू झाल्यापासून गत आठवडाभरामध्ये मास्क आणि सॅनिटायझरची विक्री वाढली आहे. काही मुले दर दोन दिवसाला नवीन मास्क, सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी येतात.
सुधाकर जगताप, मेडिकल चालक.
पूर्वी मुलाला शाळेत जाण्यापूर्वी चाॅकलेट किंवा नवीन पेन, पेन्सील घेऊन द्यावी लागत होती. आता वेगवेगळ्या मास्क आणि सॅनिटायझरसाठी हट्ट पुरवावे लागत आहेत.
धनंजय पाटील, पालक.
पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा --------
सुरू झालेल्या शाळा --------
विद्यार्थ्यांची उपस्थिती --------