निजामपूरचा आषाढीचा उत्सव स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:28+5:302021-07-19T04:23:28+5:30
निजामपूर येथे सन १८०४ पासून आषाढी उत्सव अव्याहतपणे होत आहे. कोरोना संकटामुळे यंदाच्या २१७ व्या वर्षीचा उत्सव पण सार्वजनिक ...

निजामपूरचा आषाढीचा उत्सव स्थगित
निजामपूर येथे सन १८०४ पासून आषाढी उत्सव अव्याहतपणे होत आहे. कोरोना संकटामुळे यंदाच्या २१७ व्या वर्षीचा उत्सव पण सार्वजनिक होऊ शकणार नाही.
आषाढी एकादशीस मध्यान्ही निजामपूर येथे पांडुरंग अवतरतात अशी भाविकांची अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिरात मध्यान्ही खूप गर्दी होत असते. टाळमृदंगांच्या तालात भक्ती भजनांनी, विठ्ठल नाम गजराने दरवर्षी हा परिसर दुमदुमतो. पांडुरंगाची लोभस मूर्ती डोळ्यात भरण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्यानंतर दुपारी ३ वाजता विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींची मोठ्या लाकडी रथातून गावातून मिरवणूक निघत असते. मोठ्या संख्येत तरुणाई रथ ओढण्यासाठी सरसावलेली असते. गावाला भक्तिमय यात्रेचे स्वरूप आलेले असते.
पूर्वी उत्सव काळात हभप मुरलीधर महाराज, लक्ष्मण महाराज, राजेश्वर महाराज आणि त्यानंतरच्या काळात शाम महाराज यांची एकादशीस कीर्तने होत असत. त्यानंतर द्वारकानाथ महाराज, राया महाराज, राजेंद्र महाराज यांची रसाळ भाषेतील कीर्तने, प्रवचने श्रोत्यांसाठी पर्वणीच असायची. यंदाच्या दुसऱ्या वर्षीदेखील ती होऊ शकणार नाहीत. मंगळवारी दुपारी मंदिरात पांडुरंगाची पूजा, महाआरती होईल. काही मंडळींची भजने होतील. त्यावेळी कोरोना नियमांचे काटेकोर पालन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या नंतर रथाची पूजा जागेवरच केली जाणार आहे. रथ मिरवणूक स्थगित केली असल्याचे हभप राजेंद्र उपासनी यांनी सांगितले.