अखेर कोरोनाचा शिरकाव झाल्याने निजामपूर-जैताणे प्रतिबंधित क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 22:58 IST2020-06-21T22:57:41+5:302020-06-21T22:58:11+5:30

१२ जणांना केले होम क्वॉरंटाईन । नाशिक येथे उपचारासाठी गेलेल्या तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Nizampur-Jaitane restricted area due to corona infiltration | अखेर कोरोनाचा शिरकाव झाल्याने निजामपूर-जैताणे प्रतिबंधित क्षेत्र

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : साक्री तालुक्यातील निजामपुरात अखेर कोरोनाचा शिरकाव झाल्याने निजामपूर व जैताणे ही दोन्ही गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहे. नाशिक येथे उपचारास गेलेल्या तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
निजामपूर येथील चैनीरोडवरील एका तरुणाची नाशिक येथे कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे साक्रीचे नायब तहसीलदार अंगद असटकर यांनी ग्रामपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत निजामपूर आणि जैताणे ही दोन्ही गावे १४ दिवसांसाठी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशुतोष साळुंखे, डॉ.अमोल पवार, डॉ.अभिषेक देवरे, नरेंद्र धुरमेकर यांनी चैनीरोडवरील रुग्णाच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली. संबंधितांची नावे घेऊन संबंधित १२ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
३०० मीटरचे क्षेत्र कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले असून बॅरिकेट करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे दोन पथक या क्षेत्रात १४ दिवस घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार असल्याचे डॉ.अमोल पवार यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर साक्रीचे नायब तहसीलदार अंगद असटकर यांनी बैठकीत निजामपूर व जैताणे ही दोन्ही गावे २० जून ते ४ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली. मंगळवारी रात्रीपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल दुकाने, पंप, कृषी विषयक दुकाने, पीठ गिरणी, दूध वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे म्हटले आहे. भाजीपाला विक्री सुद्धा बंद केली आहे. हातगाडीवरून भाजीपाला विक्री देखील बंद केली आहे.
मंगळवारपर्यंत येथील बँका बंद राहतील. मात्र, कृषी विषयक कर्ज आणि शासकीय व्यवहार सुरू ठेवता येतील, असे नायब तहसीलदार यांनी नमूद केले.
बुधवारपासून कृषीविषयक दुकाने सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत उघडी राहतील. दूध सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत विक्री होईल. मेडिकल व दवाखाने यांना वेळेचे बंधन नाही. भाजीपाला विक्री सुरक्षित अंतराची अट ठेऊन परवानगी देऊन सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत राहणार आहे. निजामपूर येथील परवाना धारक भाजीपाला विक्रेते एस.के. नगरात ओपन स्पेसवर सकाळी ८ ते १२ वेळेत भाजी विक्री करतील.
जैताणे येथील भाजीपाला विक्रेत्यांना एव्हीएम हायस्कूल ग्राउंड उपलब्ध करुन देण्याचे ठरले. मास्कशिवाय कुणीही फिरू नये. जे सुरक्षित अंतर ठेवणार नाहीत त्यांच्याविरुद्ध ग्रामपालिकेने पोलिसात तक्रार करावी. कुणीही अफवा पसरवू नका, अशा सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस सरपंच सलीम पठाण, ग्रामविकास अधिकारी पी.बी. मोराणे, एपीआय सचिन शिरसाठ, पंचायत समिती सदस्य सतीश राणे, माजी सरपंच अजितचंद्र शाह, माजी पं.स. सदस्य वासुदेव बदामे, जैताणे सरपंच ईश्वर न्याहाळदे, ग्रामपंचायत सदस्य परेश पाटील, जाकीर तांबोळी, मंडळ अधिकारी व्ही.व्ही. बावा, तलाठी प्रशांत माळी, तलाठी रोझकर, तलाठी साळुंखे, युसूफ सैय्यद, भैय्या गुरव, त्रिलोक दवे, प्रवीण शाह, सागर शिंपी, ताहीर मिर्झा, परवेज सैय्यद आदींची उपस्थिती होती.
निजामपूर गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे वृत्त समजले. तरी शासकीय यंत्रणा गंभीर नसल्याची संतप्त प्रतिक्रिया युसूफ सैय्यद यांनी सभागृहात वारंवार बोलून दाखविली.
सोमवारपासून निजामपूर, जैताणे येथे दूरदूरच्या गावाहून लग्न बस्त्यासाठी, कैऱ्या घेण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी लोकांची गर्दी होत होती. त्यावेळी कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत होती. याबाबत आपण प्रशासनास दररोज माहिती देत होतो. पण कुणीही लक्ष दिले नाही. मग परिणाम काय आला, असा सवालही त्यांनी केला.
ग्रामपालिकेने मंगळवारपासून निर्णय घेऊन स्वत:हून लॉकडाऊन जाहीर केले होते. दोन दिवसांनी लोकांनी त्याचे गांभीर्य लक्षात न घेता नियम झुगारले. तर काहींनी शिव्या दिल्याचे ग्रामविकास अधिकारी मोराणे यांनी सांगितले. अखेर निजामपूरात कोरोनाचा शिरकाव झाला. रुग्ण आढळला, सर्व गाव बंद झाले. आता कोणाला सांगणार, असा प्रतिसवालही त्यांनी केला.

Web Title: Nizampur-Jaitane restricted area due to corona infiltration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे