निजामपूरला दरोडेखोराला पाठलाग करुन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:36 IST2018-05-10T22:36:03+5:302018-05-10T22:36:03+5:30
दरोडेखोर फरार : अपर अधीक्षकांच्या पथकासह एलसीबीची कारवाई

निजामपूरला दरोडेखोराला पाठलाग करुन पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर/धुळे : निजामपूर (ता. साक्री) येथील पोलिसांच्या गस्ती पथकाने दरोडेखोरांचा मनसुबा गुरुवारी पहाटेच्या सुमारास हाणून पाडला़ पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग केला. मात्र, पोलिसांना एका दरोडेखोराला पकडण्यात यश आले, तर अन्य फरार झाले. पकडलेल्या संशयित दरोडेखोराकडून एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे़ दरम्यान, धुळे शहरात अपर पोलीस अधीक्षकांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेनेही संशयितांकडून गावठी कट्टा व काही जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
निजामपूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर हे पहाटेच्यावेळी पेट्रोलिंग करत होते़ टिटाणे गावाच्या पूर्वेला जामदा रोडवर पाच ते सहा जणांची टोळी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपली असल्याची गोपनीय बातमी मिळाली़ लागलीच दिलीप खेडकर यांनी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, हेड कॉन्स्टेबल अहिरे, पोलीस कर्मचारी बागुल, पिंजारी, ठाकरे, राठोड, शेंडगे, अहिरे यांच्यासह योगेश शिरसाठ, राहुल सानप, संजय जाधव, विशाल लोंढे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली़ रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपात दोन मोटारसायकली उभ्या असल्याचे पोलिसांना आढळले़ पोलिसांनी हा परिसर चारही बाजूने घेरण्यास सुरुवात करताच झुडपातून अचानक ६ जण बाहेर आले़ त्यांनी पळ काढला असता त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला़
अंधाराचा फायदा घेऊन पाच जण पळून जाण्यास यशस्वी ठरले तर एक जण पोलिसांच्या ताब्यात सापडला़ त्याची चौकशी केली असता त्याने संतोष नामदेव भोसले (जामदा, ता़ साक्री) असे आपले नाव असल्याचे सांगितले़ त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आढळला़ पळून गेलेल्यामध्ये राहुल चव्हाण, रमेश भार्इंदर चव्हाण, पी़ के़ पाटील, संतोष उर्फ सोयरा लक्ष्मण भोसले आणि जामदा येथील एक जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़
घटनास्थळावरून एमएच १८-एव्ही ४४०५ आणि एमएच १९- बीडी ५६१९ अशा दोन दुचाकीसह मोबाइल, चाकू, मिरचीची पूड, गावठी कट्टा असे मिळून ९६ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़