नेरला घरे, पशुधनाचे पंचानामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:43 IST2021-09-10T04:43:20+5:302021-09-10T04:43:20+5:30
नेरसह भदाणे परिसरात अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक घरांच्या भिंती आणि धाबे पडून नुकसान झाले आहे. तर गुरुवारी ...

नेरला घरे, पशुधनाचे पंचानामे
नेरसह भदाणे परिसरात अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक घरांच्या भिंती आणि धाबे पडून नुकसान झाले आहे. तर गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने घरांचे आणि पशुधनाच्या काही नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी नुकसान झालेल्या घरांचे फोटो, सातबारासह अन्य आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करून पंचनामे पूर्ण करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
शेतीच्या पंचानाम्याविषयी संभ्रम
नेर परिसरात अतिवृष्टी झाली असली तरी पिकांचे तूर्त जमिनीवर आडवे पडून नुकसान झाल्याचे दिसत नाही. मात्र, शेतात गुडघ्याभर पाणी साचल्याने पिके पिवळी पडू लागली असून बोंडआळीसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी हे संकट कसे दूर करावे, या विवंचनेत आहेत. तर दुसरीकडे कृषी आणि महसूल विभाग शेतकऱ्यांच्या तक्रारीची वाट पाहत आहे. तूर्त जरी दृश्य नुकसान दिसत नसले तरी शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाने तत्काळ स्वतःहून शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.