नेर आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST2021-07-22T04:22:57+5:302021-07-22T04:22:57+5:30
नेर हे ४० हजार लोकवस्तीचे मोठे गाव आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असून, प्राथमिक उपचारांव्यतिरिक्त मोठ्या ...

नेर आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे
नेर हे ४० हजार लोकवस्तीचे मोठे गाव आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असून, प्राथमिक उपचारांव्यतिरिक्त मोठ्या उपचारासाठी नेर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना ३० कि. मी अंतरावर धुळे जिल्हा रुग्णालयात जावे लागते. नेर या गावातून सुरत - नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. त्यामुळे महामार्गावर अपघाती रुग्णदेखील नेर प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून आहेत. बराच वेळा गंभीर जखमी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा तत्काळ न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाकाठी जवळपास ४००पेक्षा अधिक महिलांची प्रसुती होते. वेळप्रसंगी एखाद्या
महिलेस धुळे येथे पाठवावे लागते. त्यामुळे नेर येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यास महिलांनादेखील मोठा दिलासा मिळणार आहे. नेर गावाच्या परिसरातील १० किलोमीटर अंतरावर अकलाड, मोराणे प्र. नेर, लोणखेडी, लोहगड, म्हसदी, देऊर बु., देऊर खु., भदाणे, खंडलाय बु., खंडलाय खु,, खंडलाय बांबुर्ले, शिरधाने प्र. नेर, ककाणी, काळगाव ही गावे आहेत. या गावांची लोकसंख्या ६० हजारांहून अधिक आहे.
ग्रामीण रुग्णालयासाठी नेर पात्र.......
खासदार भामरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालयाची ठिकाणे ठरवण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता नेर येथे होत आहे. ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक असणारी पर्याप्त जागा, रस्ता, वीज यांचीदेखील उपलब्धता आहे. म्हणून प्राधान्यक्रमाने नेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करावे, असे आवाहन खासदार भामरे यांनी केले आहे.
मागणी केल्याबद्दल खासदार डाॅ. सुभाष भामरे यांचे नेर व पंचक्रोशीतील नागरिकांनी आभार मानले.